मुंबई - पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले व अंधेरी रेल्वे स्थानकातील सूचना फलकावर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना लिहिल्या आहेत. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे आहे का? या फलकावर मराठीतुन सूचना का निर्देशित करण्यात आल्या नाहीत असा सवाल शिवसेनेचे विलेपार्ले येथील शाखा क्रमांक 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.
गेल्या 8 ते 10 दिवसांपासून इंग्रजी व हिंदी भाषेत या सूचना विकरपार्ले व अंधेरी रेल्वे स्थानकात निर्देशित केल्या असून नंतर पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर या सूचना निर्देशित करण्यात येणार असल्याची सुगावा शिवसेनेला लागला आहे अशी माहिती डिचोलकर यांनी लोकमतला दिली.
पश्चिम रेल्वेने लवकर येथील सूचना फलक विलेपार्ले व अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकात मराठी भाषेत निर्देशित न केल्यास शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते,आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आंदोलन छेडेल असा ठोस इशारा पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आला असल्याची माहिती डिचोलकर यांनी शेवटी दिली.