Join us

पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे मोहरे निश्चित

By admin | Published: February 02, 2017 3:26 AM

मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती तोडल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेली

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई

मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती तोडल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेली सेना-भाजपा युती येत्या २१ तारखेला स्वबळावर एकमेकांसमोर निवडणूक लढणार आहे. दोन्ही पक्षांकडे एका जागेवर अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी सेना आणि भाजपाने अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. सेना कोणत्या जागेवर आपले उमेदवार जाहीर करते त्यावर भाजपाचे लक्ष आहे. पश्चिम उपनगरातील ज्या ठिकाणी उमेदवारीवरून वाद नाही. त्याजागांचे उमेदवार शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी आज जाहीर केली आहे. आज विभागप्रमुखांनी आपल्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. उद्या (गुरुवारी) संबंधित निवडणूक अर्ज निवडणूक कार्यालयात सादर करा अशा सूचना त्यांनी उमेदवारांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी उमेदवारीवरून वाद आहेत, त्या जागांच्या उमेदवारांना अजून विभागप्रमुखांकडून उमेदवारीबाबत ठोस निरोप आलेला नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवल्याचे समजते. रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांनी सेनेतील वादग्रस्त जागांवरील उमेदवारीबद्दल अंतिम निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिवसेनेने प्रभाग २ मधून माजी नगरसेवक आणि उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, प्रभाग ३ मधून उपविभागप्रमुख बाळकृष्ण ब्रीद, प्रभाग ४ मधून माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, प्रभाग ६ मधून विभागप्रमुख प्रकाश कारकर यांचा मुलगा हर्षद कारकर, प्रभाग ७ मधून विद्यमान नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग १०मधून मिलिंद म्हात्रे, प्रभाग ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत आलेल्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे, प्रभाग १४ मध्ये मनसेतून सेनेत आलेले मनसे नगरसेवक चेतन कदम यांच्या पत्नी भारती कदम, प्रभाग १६ मधून मनसेतून सेनेत आलेल्या प्रीती दांडेकर, प्रभाग १८मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेविका संध्या विपुल दोशी, प्रभाग २५ मधून काँग्रेसमधून सेनेत आलेले नगरसेवक आणि आर (दक्षिण) चे प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांच्या पत्नी माधुरी भोईर, प्रभाग २६मधून माजी नगरसेविका भारती पंडागळे, प्रभाग ३६मधून नगरसेवक सुनील गुजर यांच्या पत्नी स्वाती गुजर, प्रभाग ४१ मधून माजी नगरसेवक सदाशिव पाटील, प्रभाग ४३मधून काँग्रेसमधून सेनेत आलेले नगरसेवक भूमसिंग राठोड, प्रभाग ६८मध्ये काँग्रेसमधून गेल्या शनिवारी सेनेत आलेले नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा)आंबेरकर यांची उमेदवारी जाहीर करून एबीफॉर्म दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.