पश्चिम उपनगरात आज वीजकपात, विद्युत वाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:47 AM2018-03-24T03:47:18+5:302018-03-24T03:47:18+5:30
एमएमआरडीएतर्फे एवोना प्लाझा सोसायटी, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम २५ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई : एमएमआरडीएतर्फे एवोना प्लाझा सोसायटी, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम २५ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, विलेपार्ले, जुहू, अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि चारकोप परिसरातील विद्युत पुरवठा पहाटे ३ ते ७ वाजेदरम्यान बंद राहील, असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.
याचा फटका रिलायन्सच्या वीजग्राहकांना बसणार नाही, असे रिलायन्स एनर्जीचे म्हणणे आहे. या कामादरम्यान आमच्या ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत, असे प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. गैरसोय टाळण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अस्तित्वात असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची उंची १४ मीटरवरून २१.५ मीटर इतकी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.