मनोहर कुंभेजकर
मुंबई-पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी भविष्यात फुटणार आहे. वनविभागाच्या हद्दीत असलेल्या ४०० मीटरच्या रस्त्याची एनओसी वनविभागाकडे गेली अनेक वर्षे अडकली होती. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या १२० फूटी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते,मात्र सदर भागातील १३०० मीटर रस्त्यांच्या कामापैकी ४०० मीटर रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीत येत होते.मात्र सदर रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे रस्त्याचे काम लालफितीत अडकले होते.पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या प्रलंबित रस्त्याचे काम भविष्यात मार्गी लागणार आहे. लोकमतने देखील गेली सदर प्रश्न अनेक वर्षे सातत्याने मांडला आहे.
सदर रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशीचे स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी अलीकडेच संबधित अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथी गृहात स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर व आमदार प्रभू यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन सदर रस्त्याचे काम मार्गी लावा असे आदेश दिले होते.
आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे आणि वनखात्यातील जैविक वैविधतेला बांधा न येता त्यांच्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंबई महानगर पालिकेने दि,२ नोव्हेंबर रोजी मालाड जलाशय टेकडी ते आप्पापाडा या वनखात्याच्या जागेतून जाणाऱ्या आणि कांदिवली पूर्व लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या सदर ३६.६० मीटर लांब आणि १८.३० मीटर डीपी रोडच्या कामाची निविदा काढली आहे.
आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न आता लवकर मार्गी लागणार आहे. भविष्यात मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली पूर्व लोखंडवाला दरम्याचे अंतर कमी वेळात पूर्ण होणार असून नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार असल्याची माहिती मुंबईचे उपमहापौर व प्रभाग क्रमांक ४०चे स्थानिक नगरसेवक अँड.सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत व प्रशांत कदम यांनी दिली.