मुंबई :पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे फुकट्या प्रवाशांमध्ये देखील मोठी भर पडत आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर दरम्यान फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १२८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्स, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम पश्चिम रेल्वेकडून राबविण्यात येते. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अनुभवी तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. त्यामध्ये १२८.४२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातून वसूल केलेल्या ३३.६० कोटी रुपयांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, डिसेंबर २०२३ मध्ये बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह २.२४ लाख विनातिकीट प्रवाशांकडून १२.७१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याव्यतिरिक्त, डिसेंबर महिन्यात मुंबई उपनगरीय विभागात सुमारे ९१ ००० प्रकरणे शोधून पश्चिम रेल्वेने ३.५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
या मोहिमेचा परिणाम म्हणून, एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४६००० हून अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे आणि १.५४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, जो मागील वर्षीच्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे.