तस्करी करणारे त्रिकूट जाळ्यात
व्हेल माशाची पावणेतीन कोटींची उलटी जप्त
तस्करी करणारे त्रिकूट जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळख असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ४ने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेने या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याजवळून २ कोटी ७० लाखांची उलटी जप्त केली.
व्हेल माशाची उलटी उर्फ समुद्रात तरंगते सोने, हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो. हा पदार्थ अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य, तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी वापरला जातो. याची खरेदी-विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे.
आंतराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. यावर शासनाने बंदी आणली आहे, तरीही काही जण मोठ्या प्रमाणात याची तस्करी करताना दिसून येतात. दरम्यान, व्हेल माशाच्या उलटीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण मुलुंड पश्चिमेकडील साल्पादेवी पाडा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष चारच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, या पथकाने वन अधिकाऱ्यांच्या मदतीने बोमाटे चाळ येथे छापा टाकून २ किलो ७०० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली. याची बाजारभावातील किंमत २ कोटी ७० लाख रुपये आहे.
गुजरात, राजकोटमधील रहिवासी असलेला यातील एक आरोपी हा कडिया काम करतो, तर मुलुंडमधील रहिवासी आरोपींपैकी एक दलाल आणि दुसरा टीव्ही मॅकेनिक आहे. आरोपींनी ही उलटी कोठून आणली, याबाबत गुन्हे शाखा कसून चौकशी करत आहे. यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.