लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. मात्र, या कोरोनाच्या लाटेत रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या काळजीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था होती. तशी व्यवस्था आता नाही किंवा हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, असे म्हणणे मांडले जात आहे.
गोरेगाव पूर्व, संतोष नगर येथे नवीन महापालिका शाळेजवळ डॉ. संगीता होळंबे यांचा दवाखाना आहे. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण या भागात मिळू लागले. मात्र, रुग्ण सेवा ही इश्वरसेवा आहे. या ब्रीद वाक्याचे तंतोतंत पालन करून त्या व त्यांचे पती डॉ. चंद्रमोहन होळंबे रुग्णांची सेवा करत आहेत. संतोष नगर हा तसा स्लम भाग, तर नागरी निवारा परिषद व न्यू म्हाडा कॉलनी येथे मध्यम व उच्च मध्यम वर्गीय नागरिक राहतात. रोज या दवाखान्यात येथील नागरिक उपचारासाठी येतात. एकीकडे रुग्णांवर उपचार करताना डॉ. होळंबे दाम्पत्य स्वतःची व कुटुंबाची काळजी तितकीच घेतात. त्यांच्या रुग्णालयात मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही, तसेच सॅनिटायझरचीसुद्धा येथे व्यवस्था केली असून, सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
तसेच रुग्णांशी चर्चा करतांना त्यांना औषधे देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आमच्या समोर स्क्रीनसुद्धा लावण्यात आली आहे. तसेच रुग्णांनी फोनवरून संपर्क साधल्यास त्यांना औषधे सांगतो, तर वेळप्रसंगी आम्ही त्यांच्या घरी त्यांना तपासायलासुद्धा जातो. कोरोना काळात आमची वैद्यकीय सेवा नॉन स्टॉप सुरू आहे. आमच्या घरी आम्ही दोघे व दोन मुले आहेत. घरी आल्यावर आम्ही कपडे डेटॉलच्या पाण्यात धुवायला टाकतो. तसेच दिवसातून किमान तीन वेळा तरी आंघोळ करतो. आम्ही सर्वजण आमच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतो, असे डॉ. चंद्रमोहन होळंबे यांनी सांगितले. सर्वांनी नियमांचे पालन केले आणि वेळीच उपचार केल्यास आपण कोरोनावर निश्चित मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
------------------
स्वतःसोबत कुटुंबाची काळजी
डॉ. किशोर पांडव आणि डॉ. गायत्री कुलकर्णी पांडव गोरेगाव येथे गेली २५ वर्षे वैद्यकीय सेवा देत आहेत. वैद्यकीय व्यवसाय करत असताना आम्हाला स्वतःची व सोबत कुटुंबाची काळजी घ्यावी लागत होती. कोरोनामध्ये पेशंट तपासताना पीपीई कीट्स वापरत होतो. क्लिनिकमधून घरी आल्यावर सर्व कपडे सोडियम हायपो क्लोराईडमध्ये टाकून धुवत होतो व आंघोळ करत असे. आमची व कुटुंबाची काळजी घेताना आहार विहार व औषधी यांचा विचार करत असतो. स्वतः व कुटुंबाला रोज २-३ वेळा वाफ घेत असे. सकाळी व रात्री झोपताना पाचेंद्रिय वर्धन तेल नस्य करत असू. सकाळीच प्राणायाम योग व अर्धशक्ती व्यायाम करत असू. त्याचबरोबर ब्रह्मविद्या व प्रणिक हिलींग करत असू.
------------------
जीवावर उदार होऊन काम
वैद्यकीय सेवा करतांना आपली स्वतःची, कुटुंबाची व समाजाची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना सांभाळावं लागते. कारण सगळे जग जेव्हा घरात आहे, तेव्हा आपले आई आणि बाबा क्लिनिकमध्ये जाऊन स्वत:च्या जीवावर उदार होऊन पेशंट्स तपासतात. ही गोष्ट त्यांच्या बालमनाला रुजणे तसं कठीण. पण, आपले आई, बाबा इतक्या सगळ्यांचे प्राण वाचवतात, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, हे समजावे लागले. आपणसुध्दा आई, बाबांना साथ दिली पाहिजे, हे त्यानी जाणले म्हणून आम्ही दोघे कोरोना पेशंट्सची, आमची काळजी घेण्यात यशस्वी झालो आहोत, असे डॉ. किशोर पांडव आणि डॉ. गायत्री कुलकर्णी पांडव यांनी सांगितले.
------------------
त्रिसूत्रीचे पालन
आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आपण सर्वांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि वेळीच उपचार करावे, ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केल्यास आपण निश्चित कोरोनावर मात करू, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
------------------
रुग्णशय्या पुन्हा कोविड रुग्णांसाठी सक्रिय
महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्णालयात ८० टक्के रुग्णशय्या पुन्हा कोविड रुग्णांसाठी सक्रिय केल्या जात आहेत. मुंबईत दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी ३ हजार ५०० इतकी रुग्णशय्या व्याप्ती होती, तर आता ९ हजार ९०० रुग्णशय्यांवर रुग्ण आहेत. पैकी ८ हजार ४०० मुंबईतील, तर १ हजार ५०० मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मागील ४८ दिवसांत एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत फक्त ५ हजार बेड रुग्णांसाठी आवश्यक भासले. म्हणून रुग्णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
------------------
संसर्ग वाढत असल्याने...
मुंबईतील ३५ मोठ्या रुग्णालयांमध्ये मिळून ४ हजार ८०० बेड कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध होते. कोविड संसर्ग मध्यंतरी नियंत्रणात आल्यानंतर सर्व मिळून २ हजार ३५० रुग्णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. संसर्ग वाढत असल्याने आता पुन्हा ४ हजार ८०० ही मूळ कोविड रुग्णशय्या क्षमता गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, लहान व मोठे खासगी रुग्णालये मिळून ७ हजार रुग्णशय्या कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होतील.
------------------
सरकारी व खासगी रुग्णालये
बीकेसी कोविड सेंटर टप्पा २ मध्ये सुमारे ७५०, तर गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये १ हजार याप्रमाणे रुग्णशय्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. नेस्कोची क्षमता ३ हजार रुग्णशय्यांची असून, सध्या १ हजार बेड उपलब्ध आहेत. बीकेसीमध्ये २,१०० बेड क्षमता असून, सध्या १ हजार बेड उपलब्ध आहेत. रिचर्डसन क्रुडास कोविड सेंटरमध्ये ७०० बेड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. फक्त जम्बो सेंटर्सचा विचार करता एकूण ९ हजार रुग्णशय्या उपलब्ध असतील. सर्व सरकारी व खासगी रुग्णालये इत्यादी मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त रुग्णशय्या मुंबईमध्ये उपलब्ध राहणार असून, हे सर्व बेड तयार आहेत. ते फक्त टप्प्या-टप्प्याने व मागणीनुसार कार्यान्वित करायचे आहेत.
------------------