गृहमंत्र्यांचा सीबीआयला सवाल : माहिती जाहीर करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र त्यामागील नेमके कारण त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे सीबीआयने आतापर्यंत काय तपास केला हे जाहीर करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच ती आत्महत्या नसून ती हत्या असल्याबद्दल काही पुरावे मिळाले आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जूनला त्याच्या वांद्रे येथील घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांचा याप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असताना त्याचे कुटुंबीय व भाजपच्या नेत्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप केला होता. तसेच मुंबई पोलिसांच्या तपासावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
बिहारमध्ये त्याबाबत दाखल केलेला गुन्ह्याचा आणि मुंबई पोलिसांकडील तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केला. त्या घटनेला ४ महिने उलटली आहेत. दिल्लीतील एम्समध्ये पुन्हा व्हिसेरा तपासल्यानंतर डॉक्टरांच्या विशेष समितीनेही ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सीबीआयने अद्याप भूमिका स्पष्ट केलेले नाही. यावरूनच राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटर पोस्ट करीत प्रश्न उपस्थित केले आहेत.