"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:29 PM2023-04-12T19:29:26+5:302023-04-12T19:31:01+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी राज्यात वृक्ष आणि फळ लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे
मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ८ महिने होऊन गेले, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे, दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल अवस्था असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच, आमदार बच्चू कडू हेही मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचेही सातत्याने माध्यमांत असते. मात्र, आपण नाराज नसून धडाडीने चांगले निर्णय होत आहेत. तेच आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच, आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून दबंग निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत त्यांच्या कामाचं कौतुकही केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी राज्यात वृक्ष आणि फळ लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, अमरावतीत स्कायवॉल्क सुरु करणार असून हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न असून वैद्यकीय व कृषी महाविद्यालयही लवकर बनविण्यात येईल. आता, घरेलू कामगारांनाही फंड देणार येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांसोबतच शेत मजुरालाही अपघात विमा मिळणार आहे. आता घरी दिव्यांग व्यक्ती असल्यास घरकुल मिळणार असल्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती बच्चू कडू यांनी बैठकीनंतर दिली. तसेच, राष्ट्रवादीच काय तर शिंदे-फडणवीस सरकारसमोर आता कुठलाच पक्ष राहणार नाही, असेही आमदार कडू यांनी म्हटले.
अजित पवार सह्याद्री बंगल्यावर आले होते, यांसदर्भात प्रश्न विचारला असता, शिंदे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल होत आहे, ज्या दिशेने हे सरकार जात आहे, त्यानुसार काही पाऊलखुणा तुम्ही ओळखायला हव्यात, असे उत्तर बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिले. मी मंत्री झालो नाही, यापेक्षा दंबग निर्णय होत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. घरेलु कामगारांचा प्रश्न, दिव्यांग बांधवांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागतोय, यापेक्षा दुसरी गोड बातमी काय असावी, असे म्हणत आपण मंत्रीपदासाठी नाराज नसल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दरारा आहे. ईडी आणि कशाचा दबाव मला वाटत नाही, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे, ये दवाब की नही प्रभाव की बात है, असे म्हणत ईडीच्या कारवाया ह्या सरकारच्या दबावामुळे होत असल्याचे वृत्त बच्चू कडू यांनी फेटाळले आहे.