महिलांसाठी नाईटशिफ्ट सुरक्षिततेचे काय?
By admin | Published: May 25, 2015 10:52 PM2015-05-25T22:52:54+5:302015-05-25T22:52:54+5:30
महिलांनी नाईटशिफ्टमध्ये काम करायचे की नाही? असा सवाल अनेक वेळा उपस्थित केला जात होता.
महिलांनी नाईटशिफ्टमध्ये काम करायचे की नाही? असा सवाल अनेक वेळा उपस्थित केला जात होता. मात्र, परंतु, आता त्यावर सरकारनेच होकारात्मक शिक्कामोर्तब केल्याने महिलांच्या नाईटशिफ्टला सरकारी मान्यता लाभली. प्रत्यक्षात आपल्या देशात दर मिनिटाला एका महिलेचा विनयभंग होत असतो. तर बलात्कार, अत्याचाराच्या घटना सतत घडत असतात. याशिवाय कामांच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारी छळवणूक पाहता नाईट शिफ्टला अनुमती देणाऱ्या सरकारने महिला सुरक्षिततेविषयी कोणती पाऊले उचलली आहेत. केवळ निर्णय घेऊन महिलांची वाह! व्वा! मिळविण्यात सरकार धन्यता मानत आहे की, खरोखरच कामाच्या ठिकाणी अथवा रात्रीच्या वेळी कामावर जाताना महिलांना सुरक्षित असल्याची भावना देणारे समाजिक वातावरण सरकार तयार करणार आहे, हा कळीचा मुद्दा आहे. समाज म्हणून त्याकडे आपण कसे पाहणार आहोत. हे महिला व कॉलेज तरूणींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या युवागिरी च्या व्यासपीठाने केला आहे. काय सांगताहेत या महिला व तरूणी नाईटशिफ्टविषयी.....
पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मानसोपचारतज्ज्ञाचे काम करणारी सिद्धी वैद्य हिने सांगितले की, महिलांना नाईटशिफ्ट असेल तर काही अडचण नाही. महिला आता आधुनिक झाल्या आहेत. विशेषत: मेट्रो सिटीतील महिला या करिअर ओरिएंटेड आहेत. त्यामुळे कोणत्याही शिफ्टमध्ये काम करून करिअरचे ध्येय गाठण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांना नाईट शिफ्टचा अडसर येत नाही. माझ्याही काही मैत्रिणी आहेत. त्या नाईट शिफ्टमध्ये काम करतात. त्यांच्या जॉबचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्या काम करीत आहेत. नाईट शिफ्टसाठी तिची स्वत:ची आणि घरच्या मंडळीची परवानगी असावी. अनेक नामांकित कंपन्या महिलांना नाईट शिफ्टसाठी कामावर बोलवितात. त्यांच्यासाठी त्यांना घरापासून नेण्याची व पुन्हा घरी आणून सोडण्याची वाहनांद्वारे व्यवस्था केली जाते. महिला सजग असल्या तरी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. एखादी घटना घडण्याची शक्यता कोणत्याही वेळी नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे महिला बिनधास्तपणे निर्धोकपणे नाईट शिफ्ट करतील इतकी स्थिती चांगली नाही. पुरू ष आणि स्त्री मानसिकता यावर महिलांची सुरक्षितता अवलंबून आहे. आपण कसे पाहतो. कसा विचार करतो. त्यातून घटना घडत जातात. महिलांना घरापासून आणण्याची व नेण्याची सुविधा दिली तरी त्याठिकाणी सुरक्षारक्षक असावा. बस, ट्रेन यासारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलिस असायला हवेत.
प्र गती महाविद्यालयात बीएस्सीसी आयटी चे शिक्षण घेणारी अंकिता लाड हिने सांगितले की, महिलांना नाईटशिफ्ट नसावी. महिलांसाठी नाईटशिफ्ट सुरक्षित नाही. एकाच ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला व पुरूष काम करीत असतील. एखादी अनुचित घटना महिलेसोबत होण्याची दाट शक्यता असते. अनेक कंपन्या व संस्था महिलांकरवी नाईटशिफ्ट करून घेतात. त्यांना नेण्यासाठी व घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था करतात. मात्र पिकअप व ड्रॉप करणाऱ्या गाडीचा चालक हा पुरूष असतो. त्याठिकाणी महिला चालक नसते. यापूर्वीही गाडी चालकांकडून अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरण ही बसमध्ये घडले आहे. क्राईम पेट्रोल व सावधान इंडिया या गुन्हेगारी सत्य कथांवर आधारित मालिकांमधूनही त्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
जोशी-बेडेकर कॉलेजला टीवायबीएला शिकणारी भाग्यश्री गोरे हिच्या मते, सध्या महीला अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले आहे. याआधी हे प्रकार कमी होते असे नाही. पूर्वी दडपले जाणारे असे प्रकार प्रसारमाध्यमांमुळे समाजासमोर येतात. अनेक महिला जागरूकपणे तक्रार देतात. त्यामुळे महिलांमध्ये जागृती आली आहे. महिला स्वसंरक्षणाचे धडे गिरवू लागल्या आहेत. नाईट शिफ्टला माझा विरोध नाही.पण महिलांना सुरक्षितता पुरविली गेली पाहिजे. कामाच्या ठिकाणी तिची काळजी घेतली गेली तर ती आपले काम अधिक चांगल्या रितीने करू शकते. नाईटशिफ्टला तिची स्वत:ची संमती असावी ती तिच्या वर लादलेली नसावी. एखाद्या महिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. अशा महिला दोन शिफ्टमध्ये काम करून अधिक अर्थार्जनही आता करू शकतील.
मानसिकता बदला
बिर्ला कॉलेजची विद्यार्थीनी रोशनी त्रिपाठी ही टीवायबीकॉमला आहे. तिने नुकतीच परिक्षा दिली आहे. नाईट शिफ्टला महिलांकरिता सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याविषयी तिने सांगितले की, महिलांसाठी नाईटशिफ्ट ही सुरक्षित नाही. आपल्या देशात विनयभंग व बलात्काराच्या घटना सारख्या घडत असतात. त्यामुळे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलेविषयी समाजात फारसे चांगले बोलले जात नाही. तिच्या चारित्र्याविषयी संशय घेतला जातो. रात्री काम करणारी मुलगी म्हणजे वाया गेलेली ही टिपिकल विचारसरणी आधी बदलायला हवी. महिलांसाठी नाईट शिफ्ट करण्याआधी पोलीस यंत्रणा सक्षम करावी. त्यानंतरच हा निर्णय घेतला गेला असता तर तो योग्य व चांगला म्हणून त्यांचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत झाले असते. परदेशातील कायद्यांच्या धर्तीवर महिला अत्याचार विरोधातील कडक कायदे करणे आवश्यक आहे. तसेच झालेल्या अन्यायांचा लवकर निकाल लावण्याकरिता जलद गती न्यायलयांची संख्या वाढविली गेली पाहिजे. तरच आपण नाईट शिफ्टचा पर्याय महिलांना देऊ शकतो. अन्यथा त्यातून महिलांच्या अत्याचाराला आमंत्रण देण्यासारखे होईल.
सोयीचे होईल...
सध्या नोकरी करीत असलेल्या केतकी कुलकर्णी यांनी सांगितले की, या निर्णयाला खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण म्हणता येईल. मात्र कंपन्यांनी महिलांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी घेतली पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत त्यांना काहीच कमी पडता कामा नये. महिलांना चांगल्या सुविधा पुरविल्यास नाईट शिफ्टमध्ये ही त्या अधिक कार्यक्षमतेने काम करतील.