वाहनांच्या किमतीचे काय घेऊन बसलात? व्हीआयपी नंबरसाठी मोजतात कोट्यवधी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:22 PM2023-05-05T13:22:53+5:302023-05-05T13:23:13+5:30
मुंबईत ९, ९९, ९९९,९९९९ या क्रमांक मालिकेला दरवर्षी मोठी मागणी असते, तसेच ११११, ११, १, ८०५५, ७८६ हे क्रमांकही मोठ्या प्रमाणात घेतले जातात.
मुंबई : गाड्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी, चॉईस नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. गेल्या वर्षभरात मुंबईकरांनी कोट्यवधी रुपये मोजले आहेत.
दुचाकी व चारचाकी संवर्गातील नवीन सिरीजमध्ये गणले जाणारे पसंती क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध असतात. वाहनचालक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे शुल्क भरून पसंती क्रमांक घेऊ शकतात. या संर्दभात प्रसिद्धीपत्रक काढले जाते. त्यात सर्व प्रक्रिया समजावून सांगितलेेली असते. तसेच कार्यालयातील कर्मचारीही मार्गदर्शन करतात.
मुंबईत ९, ९९, ९९९,९९९९ या क्रमांक मालिकेला दरवर्षी मोठी मागणी असते, तसेच ११११, ११, १, ८०५५, ७८६ हे क्रमांकही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. एखाद्या क्रमांकाला एकापेक्षा जास्त जणांनी मागणी केलेली असेल, तर ज्याने जास्त पैशांचा धनादेश दिलेला आहे त्याला तो क्रमांक दिला जातो. ज्या वाहनचालकांचे बजेट कमी असते, त्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंतही पसंती क्रमांकांची मालिका उपलब्ध आहे. वाहनचालक पसंतीच्या नंबरसाठी अर्ज करतात. काही ठराविक नंबरकडे वाहनचालकांचा अधिक कल पाहायला मिळतो. दादा, नाना अशा प्रकारची नावाची नंबरची जास्त खरेदी होत होती. मात्र हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आल्याने त्यावर कुठलेही डिझाईन करता येत नाही. त्यामुळे अशा नंबरची मागणी कमी झाली आहे.