‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:27+5:302021-05-28T04:06:27+5:30
बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समान पद्धती राबविण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सद्य:स्थितीत शिक्षण ...
बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना समान पद्धती राबविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सद्य:स्थितीत शिक्षण विभागाकडून यंदा दहावीचे मूल्यमापन कसे होईल यावर खलबतं सुरू आहेत. मात्र, या नियमित विद्यार्थ्यांसोबत लाखो विद्यार्थी बाहेरून म्हणजेच १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देत असतात. या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा शिक्षण विभाग आणि राज्य मंडळ काय विचार करणार आहे ? त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होऊ शकणार नसल्याने त्यांच्या मूल्यमापनासाठी काय निकष लावणार आहे ? असे प्रश्न या विद्यार्थी आणि काही अभ्यासकांकडून उपस्थित केले जात आहेत.
अनेक विद्यार्थी नववी पूर्ण केल्यानंतर, नापास झाल्यानंतर किंवा शिक्षणात खंड पडल्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा १७ नंबरचा अर्ज भरून देत असतात. या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती नसते. मात्र, त्यांची परीक्षा ही नियमित विद्यार्थ्यांसोबत, नियमित अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांद्वारे घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमान कसे केले जाणार याबाबत अद्याप कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचाही नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच विचार व्हायला हवा, असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग सद्य:स्थितीत दहावी मूल्यमापनासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या पर्यायाचा विचार करत आहे. शाळांनी आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या, परीक्षा, उपक्रम यांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यमापन केले जाईल. सोबतच यासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या गुणांचा आणि कामगिरीचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे; पण बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत हे निकष कसे लागू पडणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे.
मूल्यमापनाचे निकष आज जाहीर होण्याची शक्यता
शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या आतापर्यंतच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.