मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचारावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंडेंनाही टार्गेट केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. महाविकास आघाडीतील महिला नेत्याही आक्रमक झाल्या आहेत. त्यावरुनच, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला परखड सवाल केला आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती. माझ्यावर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर साईन करुन, लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांग, असा दबाव टाकला होता. मला 50 कोटींची ऑफर दिली, नंतर माझी मुले उचलून नेली. तेव्हाही मी महिला आयोगात तक्रार दिली होती, रुपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई केली नाही. मी परळीला पत्रकार परिषद घेण्यासाठी गेल्यावर माझ्या गाडीत बंदूक ठेवली. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाही काहीच कारवाई केली नाही. ते सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.'
सुषमा अंधारेंना जळगावात पोलिसांनी केवळ विचारपूस केली. मात्र, आज महाविकास आघाडी सरकार असतं तर सुषमा अंधारेंना थेट तुरुंगात टाकलं असतं. खासदार नवनीत राणा, केतकी चितळे, करुणा मुंडे या महिलांवर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अन्याय झाला. त्यामुळे, केवळ एका महिलेच्या नावाने गळा फाडणाऱ्या महिलांनी बहुवचन न लावता, केवळ एक पक्षाच्या नेत्या, किंवा संबंधित महिलेबद्दल बोलावे, ज्यावेळी आपण बहुवचन लावता तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच महिला भगिनी त्यात येतात. मग, करुणा मुंडेंही त्यामध्ये येते. त्यामुळे, महाराष्ट्रतील इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय? असा परखड सवाल करुणा मुंडे यांनी विचारला आहे.
करुणा मुंडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा निषेधही नोंदवला असून महिलांबद्दल कुणीही अपशब्द काढणे योग्य नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही महिलांवर अन्याय झाल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच, महाविकास आघाडीतील रुपाली चाकणकर, सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे या महिला नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली.