मुंबई : पहिल्याच पावसात भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्या प्रकरणी केंद्र सरकारच्या राज्य कार्यालय असलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीच्या सदस्या दिव्या सागर चरण यांनी याप्रश्नी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला निवेदन दिले होते.
२४ जूनला गोवंडीतील शिवाजी नगर येथे मलजलवाहिनीची सफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दिव्या सागर चरण यांनी निवेदनासोबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण जोडले आहे.