Join us

'अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं', आठवलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 4:56 PM

अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात.

मुंबई - जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला अनपेक्षितपणे सत्तेबाहेर जावे लागले. त्यानंतर, शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने सत्तास्थापन केली. त्यामुळे, साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधात बसावं लागलं आहे. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असे अजित पवार म्हणाले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना टोला लगावला. तसेच, अजित पवारांचे आमच्याकडे स्वागत असल्याचंही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता रामदास आठवलेंनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. अजित पवारांना पहाटे शपथ घेण्याची सवय आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं होतं, पण ते त्यांना जमलं नाही. अजित पवारांना जे जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंना जमलं. त्यांनी डेअरींगने ते करुन दाखवलं. तरीही अजित पवार इकडे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण हे सरकार कोसळून कोणी सत्तेवर येईल, असे काहीही होणार नाही, असेही आठवलेंनी म्हटले. 

काय म्हणाले होते अजित पवार 

एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्षे होतो. आमच्यातर्फे पवार साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. राज्यातील सत्ता होती. जिल्हा परिषद होती. एखाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. इतर संस्थाही ताब्यात होत्या. मात्र आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :अजित पवारएकनाथ शिंदेरामदास आठवलेशिवसेना