मुंबई : सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जावे, यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला २२ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच गणेशोत्सवासाठी ज्यांनी परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप बांधले आहेत, ते तातडीने हटविण्याचे निर्देशही न्यायालयाने महापालिकेला दिले.ध्वनिप्रदूषणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल हिराली फाउंडेशनने उल्हासनगर महापालिका व पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उल्हासनगरमध्ये भर रस्त्यावरच महापालिकेची परवानगी न घेता गणेशोत्सवासाठी सात ते आठ मंडप घालण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायालयाने तातडीने हे मंडप हटविण्याचे निर्देश महापालिकेला देत पुढील सुनावणी २२ अॅगस्ट रोजी ठेवली.
नियमांचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:54 AM