Join us

खोके कसले सांगताय? ५० कोटींपेक्षा जास्त वाटप; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 6:19 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिंदे यांनी ठाण्यात येऊन कोर्ट नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठाणे :

आम्ही ५० खोके घेतल्याचा आरोप जे करतात त्यांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून लोकांच्या आरोग्याकरिता ५० कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करून चोख उत्तर दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे आपल्या देशाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी परदेशात जाऊन करतात, त्यांना जनताच आपली जागा दाखवेल, अशा शब्दांत शिंदे यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिंदे यांनी ठाण्यात येऊन कोर्ट नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील पुतळ्यालादेखील अभिवादन केले. शेतकरी लाँगमार्चदरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत आनंद आश्रम येथील कार्यक्रमात केली. शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून, मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल, असे असणार आहे. परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  आमदार बोरनारे यांच्याबाबत पोलिस तपास करीत आहेत. गृहखाते यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेली दोन ते अडीच वर्षांत जनतेच्या आरोग्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ दोन ते अडीच कोटींचे वाटप झाले. मात्र, मागील आठ महिन्यांत आम्ही आरोग्य सेवेकरिता ५० कोटींहून अधिक रकमेचे वाटप केल्याचे शिंदे यांनी सांगितले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा व सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे, असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला. महाराष्ट्रात लोकशाहीचे राज्य आहे, त्यामुळेच आमच्या विरुद्ध, सावरकरांच्या विरोधात बोलणारे जेलमध्ये गेलेले नाहीत. 

बैस यांच्या बदलीबाबत माहीत नाहीराज्यपालपदावरून बैस यांना बदलण्यात येणार या वृत्ताबाबत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, सकाळीच ते आपल्याला भेटले. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत माहीत नाही. कोरोनाबाबत आरोग्य विभागाने बैठक घेतली आहे, टास्क फोर्स काम करीत आहे. कोरोनाचा धोका नसला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदे