Join us  

नोकरी मिळेल, असे दहावीनंतरचे अभ्यासक्रम कोणते?

By रेश्मा शिवडेकर | Published: June 03, 2024 9:58 AM

मुंबईत २,३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी ३,८९,६७५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २,६७,८६२ जागांवर म्हणजे केवळ ६९ टक्के प्रवेश झाले होते. उ

दहावीच्या निकालानंतर सध्या लाखो विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. उच्च शिक्षणाच्या असंख्य वाटा त्यांच्यासमोर आहेत. त्यातून त्यांना आवडीची, त्यांच्या ज्ञानाला व कौशल्याला पैलू पाडून प्रगतीकडे नेणारी वाट निवडायची आहे. ढोबळ मानाने दहावीनंतर प्रवेशासाठी तीन पर्याय उपलब्ध असतात. त्यातील पहिला पर्याय म्हणजे अकरावी प्रवेशाचा.मुंबई महानगर प्रदेशात केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश केले जातात. त्याची नोंदणी सुरू झाली आहे. यंदा तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत. तर त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या आयोजित केल्या जाणार आहेत. यावेळी प्रत्येक फेरीसोबत कोटांतर्गत प्रवेश समांतरपणे केले जाणार आहेत.

मुंबईत २,३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी ३,८९,६७५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २,६७,८६२ जागांवर म्हणजे केवळ ६९ टक्के प्रवेश झाले होते. उर्वरित १,२१,८१३ जागा रिक्त होत्या. तब्बल २४२ महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश झाला नव्हता. ३२० महाविद्यालयांमध्ये २० टक्के तर ४४३ मध्ये ५० टक्के आणि ३०६ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले होते. यात १०० टक्के प्रवेश होणाऱ्यांमध्ये अल्पसंख्यांक आणि मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांचा समावेश होता. म्हणजेच जागा खूप असल्या तरी ठराविक महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते.

दहावीनंतरचा दुसरा पर्याय म्हणजे पदविका प्रवेशाचा. डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभ्यासक्रमांचे प्रवेशही केंद्रीभूत पद्धतीने तीन फेऱ्यांतून होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावर स्पर्धा असते. यंदा या अभ्यासक्रमाच्या सुमारे ४०० संस्थांमधून एक लाखांच्या आसपास जागा उपलब्ध आहेत.डिप्लोमाधारकांना सुपरवायझर ते ज्युनियर मॅनेजर पदापर्यंत जाता येते किंवा स्वतःचा उद्योगही सुरू करता येतो. यात अभ्यासक्रमाच्या विविध शाखा उपलब्ध असून त्यात मुख्यत्वे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल यांचा समावेश असतो. यंदा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलसाठी स्वतंत्र तुकडी असेल. त्यांना काम करून शिकता यावे याकरिता सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी वर्ग भरविण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय थेट द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाची शाखा त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार  निवडता येणार आहे.

याशिवाय तिसरा पर्याय म्हणजे आयटीआयचा. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध ट्रेडना विद्यार्थ्यांना दहावीनंतर प्रवेश घेता येतो. राज्यात एकूण ४१८ सरकारी तर ५७४ खासगी आयटीआय आहेत. यात एकूण १,४८,५६८ जागा उपलब्ध आहेत. यापैकी सरकारी आयटीआयमध्ये ९२ हजारांच्या आसपास जागा आहेत. मुंबईत साधारणपणे २० हजारांच्या आसपास जागा उपलब्ध आहे. गेली काही वर्षे पॉलिटेक्निक आदी अभ्यासक्रमापेक्षा आयटीआयमधील प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली होती. त्यात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही ओढा या प्रवेशाकडे होता.

अकरावी प्रवेशासाठी : https://11thadmission.org.in/डिप्लोमा प्रवेशासाठी : https://dte.maharashtra.gov.in/आयटीआय प्रवेशासाठी : https://admission.dvet.gov.in/

टॅग्स :शिक्षण