मुंबई- राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का?; शिवसेनेची घटना काय सांगते, वाचा सविस्तर...!
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपला स्वतंत्र गट तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी शिंदे गट नवीन पावलं उचलताना दिसत आहे. यातीलच एक मोठं पाऊल म्हणजे शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ठरवलं आहे. 'शिवसेना-बाळासाहेब' गट असं या गटाचं नाव असेल अशी माहिती विविध प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. गुवाहाटीच्या बैठकीनंतर हे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत बंडोखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामं कोण करणार? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिल चालली आहेत, हे योग्य आहे का?, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो; एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शरद पवारांना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोणीही विशिष्ट व्यक्ती नाही. एकनाथ शिंदे हे माध्यमांशी फोनच्या माध्यमातून बोलतात. पण तसे न करता थेट मीडियाशी संवाद साधून आपल्या गटाची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी सुसूत्रता यावी यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानुसार आजच बैठक घेऊन प्रवक्त्यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरांविरोधात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टीचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. तसंच पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
तब्बल १० तासांनंतर फडणवीस मुंबईत-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. त्यानंतर १० तासानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत. भाजपाच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. फडणवीस नेमके कुणाला भेटले याची चर्चा आता सुरू झाली आहे.