Join us

एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याभाईंची- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 05:59 IST

मनसेच्या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यातील सत्ताधारी महायुतीला सणसणीत टोला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

महायुतीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषय बाजूला राहिले आहेत आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत.  त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असेही ते म्हणाले.

अमित ठाकरेंना काेणती जबाबदारी?

राज ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नवी पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रथमच केली. त्यानुसार संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपद, तर पक्षाच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली आहे. आतापर्यंत शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष अशी पदरचना होती. मात्र, आता शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष ही नवे पदे निर्माण करण्यात आली. त्यानुसार दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे.

राज यांनी केंद्रीय समितीचीही रचना केली आहे. त्यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना स्थान दिले आहे. ही समिती सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल. नांदगावकर आणि अभ्यंकर यांच्याकडे केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबईच्या विभाग अध्यक्षांवर नियंत्रणाची विशेष जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्यावर असणार आहे.

२ एप्रिलला विस्तृत मांडणी

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कामे याची आखणी २ एप्रिलपर्यंत दिली जाणार आहे. काय करायचे आणि काय करायचे नाही, हे सांगितले जाईल. ज्याला जे काम दिले आहे, तेच त्याने करावे म्हणजे भांडणे कमी होतील, अशा सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक गोष्टी मनात साचल्या आहेत. ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही त्यांनी सांगितले.

आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

एखादे विधान आपले अस्तित्व दाखवण्यासाठी करणे, आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी बोलणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. विधानसभेत जे लोक काम करत आहेत, ते निवडून आले आहेत. त्या लोकांना जनतेने निवडून दिलेले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात.

ठाण्याचा सुभेदार कोण?

ठाण्यात विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी प्रकाश भोईर आणि राजू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपविभाग अध्यक्ष पुष्कर विचारे, गजानन काळे आणि अन्य पदाधिकारी समन्वयक असतील. अविनाश जाधव हे शाखाध्यक्षांसाठी निरीक्षक म्हणून काम करतील, असे यावेळी ठरवण्यात आले.

गुढीपाडवा मेळाव्यात काय बाेलणार?

मनसेचा गुढीपाडवा मेळावा ३० मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे