काय म्हणताय? की, केम छो?रंगणार मराठी विरुद्ध गुजराती सामना, वंचित आणि मनसे निर्णायक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:37 AM2024-03-28T07:37:27+5:302024-03-28T07:37:57+5:30
मुलुंड आणि घाटकोपर हे मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ला आहेत.
मुंबई : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील आणि भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यात मराठी विरुद्ध गुजराती असा सामना रंगणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे घटकही या ठिकाणी निर्णायक ठरणार आहेत.
मुलुंड आणि घाटकोपर हे मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ला आहेत. येथे गुजराती मतदार अधिक आहेत. गेल्या निवडणुकीत या भागातून सर्वांत जास्त मतदान झाल्याने त्याचा फायदा विद्यमान खासदार मनोज कोटक यांना झाला होता. यावेळी मिहीर कोटेचा यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे अंतर्गत रुसवे फुगवे दूर करत अधिकाधिक मते खेचण्याच्या दृष्टीने कोटेचा यांची धडपड सुरू आहे. भांडुप, विक्रोळी मराठीबहुल वस्ती आहे. तसेच हा भाग सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
कोकणी आणि मराठी मतांची जोडणी करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात येत आहे. येथे ठाकरे सेनेचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीतून ठाकरे सेनेत आल्याने संजय पाटील यांना दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समन्वय साधून निवडणूक प्रचाराची रणनीती आखावी लागणार आहे. शरद पवार गटातील कार्यकर्त्यांची अंतर्गत नाराजी दूर करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.
वंचित फॅक्टरचा राेल काय?
वंचित बहुजन आघाडीने वेगळी चूल मांडल्याने पाटील आणि कोटेचा यांना मतांची गोळाबेरीज मांडणे कठीण ठरणार आहे. विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर, कन्नमवार नगर, घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात वंचितला मानणारा मोठा वर्ग आहे.
भांडुपच्या सोनापूरसह मानखुर्द-गोवंडीतील मुस्लिम मते संजय पाटील यांच्यासाठी बोनस ठरू शकतात. मात्र, गेल्या निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगरमध्ये सर्वांत कमी मतदान झाले होते.
अजित पवार गटातील कार्यकर्ते ही मते खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे येथील मतांसह मनसेची मराठी व्होट बँक कुणाच्या पारड्यात मते टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.