Plastic Ban: कसली बंदी? ही तर दर वाढविण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:29 AM2018-08-24T01:29:12+5:302018-08-24T07:03:00+5:30

प्लॅस्टिकबंदीला मुंबईत तिलांजली; कुठे उघड, तर कुठे चोरीछुपे प्लॅस्टिक पिशव्यांचा होतोय वापर

What is the ban? This is the opportunity to increase the rate! | Plastic Ban: कसली बंदी? ही तर दर वाढविण्याची संधी!

Plastic Ban: कसली बंदी? ही तर दर वाढविण्याची संधी!

Next

मुंबई: राज्यासह मुंबईत लागू झालेल्या प्लॅस्टिकबंदीला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने प्लॅस्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे व्यापारी वर्गासह दुकानदारांवर कारवाई करत आपण किती सक्षम आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता दोन महिने उलटत असतानाच महापालिकेची कारवाई शिथिल झाली. परिणामी प्लॅस्टिकचा सुळसुळाट झाला असून, मुंबई शहरासह उपनगरात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. या प्लॅस्टिकबंदीचा फायदा उठवत अनेक फेरीवाले, भाजी विक्रेते, तसेच व्यापाऱ्यांनी दरवाढ केली आहे. बंदीमुळे प्लॅस्टिकचे दर वाढल्याचे भासवत ते ग्राहकांना फसवत आहेत. त्यामुळे ही प्लॅस्टिकबंदी म्हणजे त्यांच्यासाठी दरवाढ करण्याची आयती संधी असल्याचे बोलले जात आहे. भायखळा, वरळी, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, मालाड, गोरेगावसह प्रमुख ठिकाणचे हेच वास्तव असल्याचे ‘लोकमत’च्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मधून आढळले आहे.

मुंबई शहरात बहुतेक ठिकाणी प्लॅस्टिकबंदीचे खुलेआम उल्लंघन सुरू असल्याचे दिसले. भाजी आणि फळ मंडईपासून रस्त्याशेजारी बसणाºया फेरीवाल्यांकडून ग्राहकांना सामान देण्यास प्लॅस्टिकचा वापर होताना दिसत आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरात असल्याचे दिसले. त्यात मनपाच्या भायखळा येथील मंडईमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांची खुलेआम विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. विशेषत: मंडईबाहेर बसणाºया फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. काही फेरीवाले ग्राहकांनी मागणी केल्यानंतर पिशव्या देताना दिसले, तर बहुतेक विक्रेते ग्राहकांची मागणी नसतानाही सर्रासपणे भाजी आणि फळे प्लॅस्टिक पिशव्यांमधून देत होते.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार झाल्या होत्या. मनपा अधिकारी येऊन गेल्यानंतर, पुन्हा पिशव्यांचा वापर होत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, आता मनपाचा कोणताही अधिकारी तपासणीसाठी येत नसल्याने पिशव्या देत असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे होते. प्लॅस्टिकबंदीनंतर फक्त पिशव्यांचे दर वाढल्याचे फेरीवाल्यांशी बोलल्यानंतर कळाले. ही दरवाढ भरून काढण्यासाठी भाजी आणि फळांच्या किमती वाढविल्याची माहितीही विक्रेत्याने ग्राहक बनून गेलेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला दिली. त्याचप्रमाणे डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भाजी भरून विक्रीसाठी ठेवल्याचे दिसले. यावरून प्लॅस्टिकबंदीचा बोजवारा उडाल्याचे दिसले. क्रॉफर्ड मार्केटसमोर कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाºया ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचीही विक्री होत असल्याचे दिसले. सुमारे १० ते १५ विक्रेते ग्राहकांची दिशाभूल करून, या ठिकाणी डस्टबिन बॅग विकताना दिसले.

रेल्वे स्थानक परिसराला प्लॅस्टिकचा विळखा
कुर्ला, घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांसह आतील परिसरातील बाजारपेठांमध्ये सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. विशेषत: कुर्ला रेल्वे स्थानक आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील बाजारपेठ परिसरात फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. ग्राहकांनी प्लॅस्टिक पिशवीची मागणी केली, तरच फेरीवाल्यांकडून ती दिली जात आहे. कारवाईच्या भीतीपोटी विक्रेते स्वत: प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळत असले, तरी ऐन वेळेला अडचणीच्या काळात प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जात आहे. विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरातही काही प्रमाणात प्लॅस्टिक पिशवीचा वापर सुरू आहे. महापालिकेचे पथक येथे कुठेच कार्यान्वित दिसत नाही आणि दिसत असले, तरी दंड केल्याचे पाहावयास मिळत नाही. दरम्यान, दुकानदार मात्र प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळत आहेत. ग्राहकांनी मागितली तरी प्लॅस्टिकची पिशवी आम्ही ठेवत नाही, असे म्हणत दुकानदारांनी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर कमी केला आहे. बहुतेक दुकानांमध्ये आता पर्यावरणपूरक प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जात आहे. दुकानदारांनी सकारात्मक प्रयोग केला असला तरी फेरीवाले मात्र खुलेआम प्लॅस्टिक पिशवीचा वापर करत आहेत.

पश्चिम उपनगरात लपूनछपून वापर
पश्चिम उपनगरात काही अंशी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. कांदिवली पूर्वेकडील क्रांतिनगर येथील मार्केटमध्ये भाजी विक्रेते लपूनछपून प्लॅस्टिक पिशवी विकताना दिसले. याबाबत विक्रेत्यांना विचारले असता ग्राहक तुटू नये, म्हणून प्लॅस्टिक पिशवी नाइलाजाने द्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
जोगेश्वरीमध्ये बहुतेक हातगाडी विक्रेते आणि फेरीवाले हे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसले, तसेच काही बीअर शॉपमध्येही प्रतिबंधित काळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर दिसला. बहुतेक मांस विक्रेतेही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसले.

प्लॅस्टिकचा वापर टाळा व पर्यावरणाचे रक्षण करा हा संदेश देत मालाड पूर्व येथील एकता नमकीन असोसिएशनच्या वतीने प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिले दोन दिवस आम्ही या निर्णयाविरोधात बंद पाळला. पी-उत्तर कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र असे किती दिवस चालणार. त्यामुळे आम्ही पालिकेला व शासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. आणि ३० जूनपासून आमच्या येथील फरसाण मार्केटमध्ये प्लॅस्टिकला आम्ही कायमची बंदी घातली. ग्राहकांना कागदी किंवा कापडी पिशव्यांतून पदार्थ देऊ लागलो, असे असोसिएशनचे सचिव नामदेव झिंगाडे यांनी सांगितले.

पूर्व उपनगरात नियम धाब्यावर
पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर या भागातील विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या असल्याचे दिसून आले. ज्या ग्राहकांनी कापडी किंवा कागदी पिशवी आणली नसेल, त्यांना बहुतांश विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशवी देण्यात येत आहे. विक्रेत्यांसह सर्वसामान्य नागरिकही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापर करताना दिसले. काही जागरूक नागरिक बाजारात जाताना स्वत:हून कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करत आहेत. घाटकोपर भागातील पटेल चौक येथील आर. बी. मेहता मार्ग, स्टेशन रोड या परिसरात काही भाजी विक्रेते प्लॅस्टिक पिशवी वापरताना दिसून आले. विक्रोळी भागात किरकोळ विक्रेत्यांकडेही प्लॅस्टिक पिशव्या दिसून आल्या. कुर्ला पश्चिमेकडील भागात फळविक्रेते खुलेआमपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत. बोटावर मोजण्याइतक्याच जागरूक विक्रेत्यांकडे कापडी किंवा कागदी पिशव्या दिसून आल्या. अशीच परिस्थिती मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूर भागात दिसून येत आहे.

दुकानांत प्लॅस्टिकला ‘नो एंट्री’
मालाड, गोरेगाव येथील दुकानांत ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्राहक म्हणून भेट दिली. त्यात प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाºया दंडाचा दुकानदारांनी धसका घेतल्याचे निदर्शनास आले. मालाडच्या एका शू मार्टमध्ये चप्पल खरेदी केल्यावर प्लॅस्टिक पिशवीची मागणी करण्यात आली. मात्र, ‘नो पॉलिथिन मॅडम’ असे उत्तर दुकानदाराने दिले, तसेच चप्पलचा जोड कागदात लपेटून कागदी बॉक्समध्ये भरून देण्यात आला. गोरेगाव स्टेशन परिसरात फुले विकण्यासाठी बसलेल्या एका फुलवाल्याकडून प्रतिनिधीने फुले आणि हार विकत घेतले. मात्र, त्यानेही या वेळी ‘पिशवी नका मागू ताई’ असे उत्तर दिले. ‘पिशवी नसेल, तर फुले नको,’ असेही मुद्दाम प्रतिनिधीने फुलवाल्याला सांगितले. त्यावर ‘फुले नाही घेतली तरी चालतील, पण पिशवी मिळणार नाही,’ असे स्पष्टपणे त्या फुलवाल्याने सांगितले.

दादरमध्ये प्लॅस्टिकबंदीला हरताळ
दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडई ते शिवसेना भवनापर्यंतच्या रस्त्यावर, तसेच नक्षत्र मॉल ते प्लाझा थिएटरपर्यंत रस्त्यालगत असलेल्या अनेक भाजी विक्रेते, फळ विक्रेते, कपडे विक्रेत्यांवर महापालिकेच्या प्लॅस्टिकबंदी भरारी पथकाने सुरुवातीला कारवाई करत दंड वसूल केला. मात्र, ही कारवाईची धार जसजशी बोथट झाली, तसे या फेरीवाल्यांनी प्लॅस्टिक पिशवीचा वापर पुन्हा एकदा सुरू केल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये निदर्शनास आले आहे. भाजी, फळे, कपडे विकत घेणाºया ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. यावर कहर म्हणजे याच भागात काही फेरीवाले प्लॅस्टिक पिशव्यांचीही विक्री करत आहेत. दादर स्टेशनला लागून असलेल्या फूलमार्केटमध्येही बहुतेक दुकानांत सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. दादरमधील भाजीमंडई, फूलबाजार येथील हजारो व्यापारी आणि फेरीवाल्यांनी सर्रास पिशव्या वापरायला सुरुवात केली आहे. पिशव्या वापरल्यास दंड होईल, अशी भीतीही त्यांच्या मनात दिसली नाही. यावर कहर म्हणजे दादरच्या पदपथावर प्लॅस्टिक पिशव्यांचीही सर्रास विक्री होताना दिसत आहे.

एसटी मुख्यालयातही अंमलबजावणी नाही
एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयात प्लॅस्टिकबंदीला तिलांजली देण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकांवर काही स्टॉलवर

Web Title: What is the ban? This is the opportunity to increase the rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.