Join us

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय? 

By प्रविण मरगळे | Published: March 04, 2020 2:45 PM

Shiv Sena: राज्यातील सत्तास्थापनेत तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी बजावली होती.

प्रविण मरगळे 

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेचा भाजपाशी झालेला संघर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरला. राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहे. हे सरकार ५ वर्ष टिकेल असा दावा तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत. मात्र अनेक मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील कुरघोडी समोर येत आहे. 

अलीकडेच एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यावरुन वाद निर्माण झाला होता. एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडे देऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने ठामपणे घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करत हा तपास एनआयएकडे देण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एल्गार परिषदेचा तपास आम्ही दिला नाही तर तो केंद्राने काढून घेतला अशी भूमिका घेतली. 

राज्यातील सत्तास्थापनेत तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी बजावली होती. सत्तासंघर्ष काळात राऊतांची पत्रकार परिषद आणि ट्विट यांची मेजवानी माध्यमांसाठी दिली जात होती. शेरोशायरीच्या माध्यमातून संजय राऊत अनेक संकेत द्यायचे तसेच भाजपाला टोमणे मारायचे. आज पुन्हा संजय राऊतांनी ट्विट केले आहे. मात्र या ट्विटचा अर्थ नेमका काय असेल? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात की, 'कुछ रिश्ते दरवाज़े खोल जाते है, या तो दिल के, या तो आँखों के' असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेचं नवं नातं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळालं आहे. मग या नात्याने शिवसेनेच्या मनात जागा केली आहे की त्यांचे डोळे उघडले आहेत असा अर्थ काढला जात आहे. सीएए, एनआरसी अशा मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद आहेत. सीएएवरुन काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. 

इतकचं नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही सरकारमधील मंत्र्यांमध्ये विसंवाद दिसून येत आहे. मुस्लीम आरक्षणावरुन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सभागृहात मुस्लिमांसाठी कायदा बनवू अथवा अध्यादेश काढू अशी भूमिका मांडली तर पत्रकार परिषदेत हा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता अद्याप माझ्याकडे असा काही विषय आला नाही, शिवसेनेची भूमिका अद्याप ठरली नाही असं सांगतिलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात संवाद नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. अशातच शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमागे बराच अर्थ दडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.   

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतट्विटरउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस