मुंबई : आपल्या आजूबाजूला नेमके कशामुळे प्रदूषण हाेते, हे अनेकदा समजत नाही. त्यामुळे प्रदूषण राेखण्यात अडथळे येतात. यावर मुंबई पालिकेने ताेडगा काढला आहे. २४ वाॅर्डांमध्ये २५० ठिकाणी सेन्सर्स बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा ८ ते १० प्रकारच्या प्रदूषणाची माहिती उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्वरित प्रदूषण राेखता येणार आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आयआयटी कानपूरची मदत घेण्यात येणार असून धूळ, धुरासह प्रदूषणकारी बेकऱ्या, शेकोट्या, बांधकाम ठिकाणची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या प्रदूषणाचे मापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रे आणि पालिकेची ५ यंत्रे आहेत. या यंत्रांद्वारे एक्यूआयची नोंद ठेवली जात आहे.
या पातळ्यांवर होणार तपासणी :
बसवण्यात येणाऱ्या सेन्सरच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणचे तापमान, आर्द्रता, धूळ, गाड्यांमधून निघणारा धूर, सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड यासह त्या त्या ठिकाणच्या प्रदूषणाची नेमकी कारणे यामुळे समजणार आहेत.
एक्यूआयची नोंद चुकीची :
अनेक ठिकाणी एक्यूआयची नोंद चुकीची येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी यंत्रात बिघाड तर काही ठिकाणी योग्य नोंद होत नसल्याचे आढळले. त्यामुळे पालिकेने स्वत: सेन्सर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा हजारांवर बांधकामे सुरू :
हिवाळा सुरू झाला असून हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असल्याने पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
३५ फूट उंच भिंत बांधणे स्प्रिंकलर बसवणे, धुळीचे कण पसरू नये, यासाठी पडदे लावणे अशा २७ प्रकारची नियमावली २३ ऑक्टोबर रोजी जारी केली. मुंबईत सद्य:स्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. प्रदूषण मापक यंत्रणांच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा दर्जा मोजला जात आहे.
मात्र ही यंत्रे बसवलेल्या ठिकाणच्या स्थितीमुळेच हे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आल्यामुळे ही यंत्रे बसवण्याची जागा बदलण्यात येणार असून सर्वसमावेशक नोंद होईल, अशा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत.