काय डेंजर वारा सुटलाय! मुंबईकरांना भरली धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 02:55 PM2023-06-13T14:55:51+5:302023-06-13T14:56:00+5:30
बिपरजॉय चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ५५ किलोमीटर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातकडे आगेकूच केली असतानाच दुसरीकडे मुंबईवर सुटलेल्या डेंजर वाऱ्याने मुंबईकरांना धडकी भरविली आहे. मुंबईवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग चक्रीवादळामुळे ताशी ५० ते ५५ किलोमीटर असून, या वाऱ्यामुळे मुंबईत कुठेही आपत्कालीन घटना घडली नसली तरी पुढील २४ तास वाऱ्याचा मारा कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनाही यंत्रणांनी सतर्कतेचे निर्देश दिले असून, मुंबई महानगर प्रदेशात बदलत्या वातावरणाचा प्रभाव म्हणून काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
बांगलादेशने नाव दिलेले बिपरजॉय चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.
याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यासह समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. ओमानच्या दिशेने पुढे सरकरणाऱ्या चक्रीवादळाने दोन दिवसांपूर्वी आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानसह गुजरातच्या दिशेने पुढे सरकू लागले. कोकण किनारपट्टीसह गुजरात किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुंबईला देण्यात आलेला पावसाचा इशारा उद्याही कायम राहणार आहे.
५० ठिकाणी झाडे उन्मळून पडली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘बिपरजॉय’ मुंबईपासून दूर गेले असले तरी मुंबईत चक्रीवादळामुळे ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, फांद्या कोसळणे, शॉटसर्किट, घराच्या भिंतीची पडझड होणे आदी घटना घडल्या आहेत. तसेच या घटनेमध्ये एकूण सहा जण जखमी झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ वादळाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत होते तसेच धुळीचे लोटही उडत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली असून मुंबई शहर विभागात १३, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात २७ ठिकाणी झाडे-फांद्या उन्मळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये वर्सोवा अंधेरी येथे झाड अंगावर कोसळल्याने रोहन बार्ला (१७) हा जखमी झाला. तर दहिसर पूर्व येथे झाड अंगावर कोसळून निशा मिस्त्री (४४) या जखमी झाल्या.
मुंबई शहर भागात ३, पश्चिम उपनगरात ३ ठिकाणी घरांचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या.
यामध्ये जुहू-वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या.
तर वांद्रे पश्चिमेतील दया उमर्षी चाळ येथे घरावरील पत्रा पडून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. तर संपूर्ण मुंंबईत १५ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले.
मुंबईत ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारीही मुंबईत वेगाने वारे वाहतील. हलका पाऊस पडेल. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अशी स्थिती असेल. मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही. मात्र, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पडझड होण्याची शक्यता आहे. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग