अरुण साधूंनी मराठी वाचकांना राजकीय भान दिलं- निळू दामले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:43 PM2017-09-25T12:43:07+5:302017-09-25T13:03:30+5:30
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं आज मुंबईत निधन झालं. पत्रकारिता, कादंबरी लेखन यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी वाचकाला जे राजकीय भान मिळवून दिलं त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी लोकमतच्या वाचकांसाठी आपले मत व्यक्त केले आहे.
मुंबई- लेखन आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळेस अरुण साधू कार्यरत होता. असं एकाचवेळेस लेखक आणि पत्रकार होणं फार कमी लोकांना शक्य होतं, त्या मोजक्या लोकांपैकी एक अरुण होता. पत्रकारिता आणि लेखन यांच्या माध्यमातून मराठी वाचकांना त्यानी एक वेगळं भान दिलं, त्यांना घटनांकडे पाहायला शिकवलं, विविध घटनांची माहिती देऊन त्यांना जागं केलं. हे त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणायला हवं.
अरुणने 'सिंहासन' लिहून महाराष्ट्रातील वाचकांना एक महत्त्वाच्या राजकीय कादंबरीची भेट दिली. आपल्याकडे राजकीय कादंबऱ्या फारशा नाहीत आणि तशा अजूनही लिहिल्या जात नाहीत. पण 'सिंहासन'ने मराठी वाचकांना राजकारणातल्या गोष्टींचं भान दिलं. हे फारच कमी लोकांना जमलं आहे. साधारणपणे राजकारणावर लिहिताना एका बाजूने लिहिलं जातं, त्यात राजकीय मतं उतरवली जातात, त्यावर राजकीय विचारांचा आणि स्वतःच्या मतांचा प्रभाव दिसून येतो. 'सिंहासन'मध्ये मात्र तसं झालेलं नाही. राजकारणाची जाण, राजकारण कसं चालतं, राजकारण नावाच्या यंत्रातील चक्र कशी फिरतात हे 'सिंहासन'मधून अरुणने आपल्याला दाखवलं. हे अत्यंत मोठं योगदान आहे.
अरुणने स्वतःची वेगळी शैली तयार केली होती. 'माणूस'मध्ये असताना त्याची ही शैली विकसित झालेली होती. एखाद्या नव्या विषयाला सखोलपणे सर्व बाजूंनी स्पर्श करुन तो त्याच्या लेखनात उतरायचा. त्यावेळेस चे गवेरा, माओ अशा मराठी किंबहुना भारतीय वाचकांसाठी नव्या विषयांवर कमी प्रमाणात साहित्य उपलब्ध असल्यामुळे पुस्तकं लिहिणं अवघड होतं. अरुणने ते आव्हान स्वीकारलं, त्याने या पुस्तकांनी नव्या प्रवाहाचा पाया रचला. जगातील अनेक विषय खोलवर अभ्यास करुन मांडले. त्याची अनेक वर्णनं कादंबरीच्या शैलीजवळ जाणारी आहे. माहितीवर असणारा भर आणि कादंबरीच्या जवळ जाणारी शैली यामुळे ती पुस्तकं सकस होत गेली. नंतर कादंबरी लेखन सुरु केल्यावर त्याला याचा फायदा झाला. राजकीय क्षेत्रातील पत्रकारिता यामध्येही अरुण साधूने एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला. अत्यंत सौम्य स्वभाव कधीही आक्रस्ताळेपणा नाही की टोकाची मतं नाहीत. त्यामुळे त्याला एक वेगळेपण मिळालं होतं. त्याची नैतिक बाजू कणखर असल्यामुळे ते त्याचं बलस्थान होतं. राजकीयदृष्ट्या त्याची मतं होती, कलही होता, त्याने कधी तो लपवला नाही पण पक्षीय कल आणि अभ्यास यांना बाजूला ठेवलं. हे अत्यंत अवघड काम आहे. पक्षीय तळी कधीही न उचलल्यामुळे तो इतरांपेक्षा नेहमी वेगळा ठरला.