आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:36 IST2024-12-05T10:33:11+5:302024-12-05T10:36:10+5:30

एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे काल रात्री स्वत: वर्षा बंगल्यावर पोहोचले होते.

What did devendra Fadnavis tell eknath Shinde in the late night meeting inside story | आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

Devendra Fadnavis Eknath Shinde Meeting ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक निकालाच्या १३ दिवसांनंतर आज अखेर नव्या सरकारचा शपथविधी पार पडत आहे. एकीकडे मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असली तरी अद्यापही मंत्रि‍पदांच्या वाटपावरून महायुतीत सुरू असलेला संभ्रम कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार असून राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावं, अशी विनंती महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून करण्यात आली आहे. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे काल रात्री स्वत: वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांची समजूत काढताना आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.

"आपण मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. निवडणुकीलाही आपण एकत्रितपणे सामोरे गेलो. तुम्ही केलेल्या मागण्यांवर आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलून तोडगा काढू, मात्र आपण सरकारमध्ये सामील व्हावं. तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवलेली असताना फक्त मी आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यास ते योग्य दिसणार नाही," अशा शब्दांत वर्षावरील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी काही प्रमाणात दूर झाली असून ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंनी काय भूमिका घेतली?

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर एकनाथ शिंदेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली. "आमचा पक्ष आहे. आगामी निवडणुकांमध्ये आमच्या शिवसेनेला ताकद मिळावी, यासाठी योग्य तो निर्णय घेतला जावा," असं शिंदे यांनी सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याने आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मागणीप्रमाणे त्यांना गृह आणि महसूल ही खाती दिली जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शपथविधीची जय्यत तयारी

आझाद मैदानावर महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिस दलातील पाच अपर आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त, २९ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ५२० पोलिस अधिकारी आणि ३५०० पोलिस अंमलदार तैनात असणार आहेत, तर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी एक अपर पोलिस आयुक्त, ३ पोलिस उपायुक्त, ३० पोलिस अधिकारी व २५० पोलिस अंमलदार सज्ज राहणार आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी, जलद प्रतिसाद दल, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथकाचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.
 

Web Title: What did devendra Fadnavis tell eknath Shinde in the late night meeting inside story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.