Join us

महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? कंगनाचा तिखट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:08 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू केलं आहे.

मुंबईत 9 सप्टेंबरला येतेय,  कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू केलं आहे. कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या या आव्हानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. शिवाय मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर तिला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही टीकेचा सामना करावा लागला. तिनं पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान देताना महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? असा तिखट सवाल केला.

तिनं ट्विट केलं की,''इंडस्ट्रीच्या शंभर वर्षांच्या इतिहासात मराठी योद्ध्यांवर एक चित्रपट बनवायची यांची औकात नाही. मुस्लीमांचे वर्चस्व असलेल्या या इंडस्ट्रीत मी माझ्या जीवावर आणि कारकीर्द धोक्यात टाकून शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला. आज मी महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारते की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?  तिनं पुढे लिहिलं की,''महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. ज्यानं मराठी अभिमान जपला आहे, हा महाराष्ट्र त्यांचा आहे. मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?''आज कशावरून सुरू झाला वाद?"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.

संजय राऊत यांनी सुनावलं"मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसंजय राऊतशिवसेना