मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी अहमदनगर येथील निळवंडे धरणाचा डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली."केंद्रीय मंत्री असताना त्यांनी राज्यातील शेतीसाठी काय केले? असा सवाल मोदींनी केला, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल करत टीका केली आहे.
भयानक... अज्ञातांनी एसटी बस पेटवली, ७३ प्रवासी सुखरूप, उमरखेड तालुक्यातील घटना
देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले. आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले होते. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सामनाच्या अग्रलेखातुनही मोदींवर टीका केली आहे. "मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे.पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?, असा सवाल या अग्रलेखातून केला आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे?
मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?’’ असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे.
मोदींच्या काळात सार्वजनिक उपक्रम बंद पडले, बेरोजगारी वाढली. आधी होत्या त्या नोकऱया गेल्या. मोठय़ा उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱयांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱया उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱया देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?, असा सवालही या अग्रलेखात केला आहे.