Join us  

समीर वानखेडेंनी बॉसशी काय चॅटिंग केले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:50 AM

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये किरण गोसावी या पंचाने एक पंचनामा हाताने लिहिला आहे तर दुसरा टाइप केलेला आहे, अशी विसंगती का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता.

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी केल्यानंतर ३ ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांचे तत्कालीन उपमहासंचालक असलेले वरिष्ठ ज्ञानेश्वर सिंह यांच्यात झालेला व्हॉटस्ॲप संवाद आता समोर आला आहे. 

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये किरण गोसावी या पंचाने एक पंचनामा हाताने लिहिला आहे तर दुसरा टाइप केलेला आहे, अशी विसंगती का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. याचा थेट खुलासा ज्ञानेश्वर सिंह यांनी वानखेडे यांना व्हॉटस्ॲपवर विचारला होता. यानंतर दोघांमध्ये काही व्हॉटस्ॲप कॉल केल्याचे दिसून येते. मात्र, नंतर शाहरूख खान आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे समर्थक या सगळ्या गोष्टी पसरवत असल्याचे उत्तर वानखेडे यांनी दिल्याचे दिसते. तर, याच प्रकरणातील अन्य पंच प्रभाकर साईल (आता मृत) याने या प्रकरणात शाहरुखकडे २५ कोटी मागितले होते. मात्र १८ कोटींवर सौदा ठरल्याचा आरोप शपथपत्राद्वारे केला होता. याची बातमीच ज्ञानेश्वर सिंह यांनी वानखेडे यांना व्हॉटस्ॲप केली. तसेच साईल याने हा आरोप शपथपत्रावर केल्याचे वानखेडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही वानखेडे यांनीही नवाब मलिक यांची खेळी असल्याचे उत्तर दिले होते. 

दरम्यान, क्रूझवरील छापेमारीनंतर एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनाही काही माहिती देणारे व्हॉटस्ॲप संदेश पुढे आले आहेत.

सर, तो आपला अधिकारी नाही...-     कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात पंच असलेला आणि नंतर आर्यन खानसोबत सेल्फीमुळे चर्चेत आलेल्या किरण गोसावी याच्याबद्दलही ज्ञानेश्वर सिंह यांनी विचारणा केली होती. -     त्यावेळी सर, तो आपला अधिकारी नाही. तो खासगी पंच आहे, असे उत्तर वानखेडे यांनी दिल्याचे चॅटमध्ये दिसून येते. 

टॅग्स :समीर वानखेडेव्हॉट्सअ‍ॅपगुन्हा अन्वेषण विभाग