मुंबई - माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी त्यांचं कौतुक केलं. विरोधी पक्षासह भाजपातील नेत्यांनीही विधानभवनात फडणवीस यांचं अभिनंदन करत, शुभेच्छा दिल्या. यावेळी, भाजपाने सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवला, तरी देवेंद्रांना मुख्यमंत्रीपद गमावावे याची खंतही अनेकांनी मनातून बोलून दाखवली.
विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी बोलविण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, मी पुन्हा येईन असं सांगितले पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं म्हणून काही वेळ वाट बघा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला. त्यानंतर फडणवीस यांनीही एका शायरीच्या माध्यमातून सत्ताधारी नेत्यांना प्रत्युत्तर दिले. याच अधिवेशनात भाजपा नेते आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक करताना मनातील खंतही बोलून दाखवली.
''देवेंद्रजींच्या नशिबात काय लिहिलंय ते त्या सटवीला माहिती. प्रत्येकाच्या नशिबात काय लिहंलय हे सटवीलाच माहिती असतं, असं म्हणत देवेंद्र यांनी राजकारणात अनेक इतिहास घडवल्याचा सांगत आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. वसंतराव नाईकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षे कालवधी पूर्ण करण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर दुसऱ्या टर्ममध्ये सर्वात कमीकाळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावे जमा झालाय. देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले अन् पुन्हा विरोधी पक्षनेते, हाही विक्रम नारायण राणेंनंतर त्यांनीच केलाय. कायद्याचा सिद्धांत मांडणारा विरोधीपक्षनेता सध्या आपल्यात आहे,'' असे म्हणत शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.