मुंबई : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुंबईसह राज्यातील विकासकामांना चालना मिळाली आहे. शिवसेना-भाजप या डबल इंजिन सरकारचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे. इतकेच काय तर या डबल इंजिन सरकारने मुंबईत ४० हजार कोटींची विकासकामे हाती घेतली आहेत. विकासकामांचा हा धडाका यापुढे असाच सुरू राहणार असल्याची ग्वाही या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.
मेट्रो असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नूतनीकरण असो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो या सगळ्या योजना मुंबईच्या विकासात भर घालणाऱ्या आहेत. राज्यात सत्तेत आल्यावर मुंबईच्या विकासासाठी या दोन्ही पक्षांकडून पैसे खर्च केले आहेत. त्यासाठी पालिकेच्या ठेवींनाही हात घातला जात आहे.
रस्ते काँक्रिटीकरणमुंबईत २ हजार किमी लांबीचे डांबरी रस्ते असून, या रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने सरकारने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले असून, उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.
फेरीवाल्यांना कर्जकोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या फेरीवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, या फेरीवाल्यांना कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाल्यांनी १० हजारांच्या बिनव्याजी कर्जासाठी पालिकेकडे अर्ज केले असून, १ लाख फेरीवाल्यांना या कर्जाचे वितरण केले आहे.
मुंबईचे सुशोभीकरणमुंबईच्या सौंदर्यीकरणांतर्गत विविध चौक, पूल, रस्त्यांचे सुशोभीकरण केले जात आहे. रस्ते, वाहतूक बेटे, चौक या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवसेना भाजप सरकार सत्तेत आल्यावर मुंबई सुशोभीकरण करण्यात आली.
स्पेशालिटी रुग्णालयमुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा, उपचार मिळावेत यासाठी ‘आपली चिकित्सा’ योजनेंतर्गत भांडुप सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ओशिवरा प्रसूतिगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय आदी कामे पालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहेत.
गेल्या अडीच वर्षांत रखडलेली कामे मार्गी लावत आहेत. मुंबईकरांच्या पायाभूत सुविधेवर भर दिला जात आहे, तसेच मुंबईकरांना आणखी चांगल्या सुविधा कशा देता येतील, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भविष्यातही जोमाने सरकार काम करील- राहुल शेवाळे, खासदार (शिवसेना, शिंदे गट)