Join us

पक्षानं त्यांना काय कमी केलं ? सुप्रिया सुळेंचं मोहिते पाटलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:38 PM

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न उभा राहिला होता.

मुंबई - खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या प्रवेशावर भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्षानं आजवर त्यांना काय दिलं नाही ? याची समोरासमोर येऊन चर्चा करा, मी खुलं आव्हान देते असे सुप्रिया सुळे यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.   

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न उभा राहिला होता. त्यावर, विजयसिंह मोहिते पाटील की रणजितसिंह मोहिते पाटील या दोन नावांची चर्चाही रंगली होती. मात्र, विजयसिंह यांनी रणजितसिंह यांना तिकीट देण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. यावरुनच मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये काहीतरी बिनसले. त्यानंतर, रणजितसिंह यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी, वडिलांचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले होते. 

दरम्यान, रणजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोहिते पाटलांना आम्ही उमेदवारी देण्याचं कबुल केलं होतं, पण त्यांनी फोन बंद ठेवल्याचं सांगितल. अजित पवार यांनीही याबाबत बोलताना, पवारसाहेबांनी त्यांची उमेदवारी फिक्स केली होती, या घटनेचा मी साक्षीदार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर, आता सुप्रिया सुळेंनीही रणजितसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर बोलताना 'कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तक कसं असेल ते ठरवू नका.' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 

टॅग्स :सुप्रिया सुळेलोकसभा निवडणूकविजयसिंह मोहिते-पाटीलसोलापूर