मुंबई : लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू आणि डेंग्यू यांसारख्या आजारांना हाताळण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने महापालिकेला ७ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी कुठे वापरण्यात आला? याचीही सविस्तर माहिती उच्च न्यायालयाने महापालिकेला देण्याचे निर्देश दिले.पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या साथीने नागरिक त्रासले होते. महापालिकेने या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलली आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी कशाप्रकारे वापरण्यात आला, याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्र्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १० जून रोजी ठेवत महापालिकेला साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आतापर्यंत काय केले आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी कुठे खर्च करण्यात आला? याची तपशीलवार माहिती ७ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)नागरिकांच्या आरोग्यासाठी यंदा महापालिकेने ३,७०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, हा निधी पूर्णपणे वापरण्यात आला नाही. गेल्या काही वर्षांपासून महापालिका मंजूर करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी केवळ १८ ते २० टक्केच निधी नागरिकांच्या आरोग्यासाठी वापरत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या रेकॉर्डस्वरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा निधी कुठे खर्च करण्यात येतो, याचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.
लेप्टो, स्वाइन फ्लू रोखण्यासाठी काय केले?
By admin | Published: April 24, 2016 3:14 AM