बालमजुरीविरोधात कसली कंबर
By admin | Published: July 2, 2014 01:11 AM2014-07-02T01:11:22+5:302014-07-02T01:11:22+5:30
मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना गुन्हे शाखेने आखली आहे.
जयेश शिरसाट, मुंबई
मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना गुन्हे शाखेने आखली आहे. या कारवाईत गुन्हे शाखा बालमजुरीविरोधी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आहे. वर्षभरात शहरातून सुमारे चार हजार बालमजुरांची सुटका करण्याचा मानस गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे.
मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील यांच्या पुढाकाराने काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी पाहणी केली. त्यातून शहरात अंदाजे चारेक हजार बाजमजूर आजघडीला राबत आहेत.
घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरी, चामड्याचा व्यवसाय, प्लास्टिक मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांत मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम काढून घेतले जाते म्हणून अशा उद्योगांमध्ये प्रौढांपेक्षा बालमजुरांसाठी मालक आग्रही असतात, असा निष्कर्ष समोर आला.
पोलीस धाड घालून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ लोटल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात, असेही या पाहणीतून समोर आले.
यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बालमजूर काम करतात, याची नोंद समाजसेवा शाखेने घेतली आहे. त्या त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखा करडी नजर ठेवणार आहे. वेळोवेळी धाडी घालून बालमजुरांची सुटका करून त्यांना पालकांच्या हवाली केले जाणार आहे. (प्रतिनिधी)