रेल्वे अर्थसंकल्पात डहाणूकरांसाठी काय?
By admin | Published: February 25, 2015 10:42 PM2015-02-25T22:42:07+5:302015-02-25T22:42:07+5:30
लवकरच जाहीर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पश्चिम
वसई : लवकरच जाहीर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पाकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील रेल्वेप्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या नव्हत्या. त्याचीच पुनरावृत्ती २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात होते की काय अशी भीती रेल्वे प्रवाशांना सतावते आहे.
पश्चिम रेल्वेवरील भार्इंदर ते थेट डहाणूपर्यंत प्रचंड नागरीकरण झाले. आजमितीस या संपूर्ण भागाची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. दररोज सुमारे एक ते दीड लाख लोक कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाण्याला ये-जा करीत असतात. परंतु रेल्वे प्रवाशांच्या वाढीच्या तुलनेत रेल्वेने कधीही प्रवाशांना दिलासा मिळेल अशा तरतुदी आजवरच्या अनेक रेल्वे अर्थसंकल्पात पहावयास मिळाल्या नाहीत. बोरीवली-विरार दरम्यान चौपदरीकरणाला १० ते १२ वर्षे लागली तर चर्चगेट-डहाणू उपनगरीय सेवेला २५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ही सेवा दीड वर्षापुर्वी सुरू झाली परंतु अद्याप ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेला मिळणाऱ्या महसूलाच्या प्रमाणात रेल्वेने या मार्गावर अधिक फेऱ्या सुरू कराव्यात अशी रेल्वे प्रवाशांना अपेक्षा होती. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ही उपनगरीय सेवा सुरू करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला फटकारल्यानंतर ही सेवा मार्गी लागली. सध्या डहाणू-चर्चगेट या मार्गावर प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अधिक रेक्स आणणे तसेच फेऱ्यांमध्ये वाढ करणे इ. बाबींवर लक्ष केंद्रीत केल्यास काहीअंशी रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. दुसरीकडे रेल्वेस्थानक परिसरातील विकासकामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. महिलांसाठी शौचालय तसेच फेरीवाल्यांना आवारातून हाकलणे व प्रत्येक रेल्वेस्थानकावर प्रतिक्षालय उभारणे तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वेस्थानकातील तिकिटखिडक्या वाढवणे इ. सोयीसुविधा दिल्यास एरव्ही त्रासदायक असलेला हा प्रवास काही प्रमाणात सुलभ होऊ शकतो. येणाऱ्या अर्थसंकल्पात रेल्वेप्रवाशांचे प्रतिबिंब दिसणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)