१०८ गावे बाधित : नगदी पिकांवर संकट आल्याने शेतकरी विषण्णनितीन काळेल
सातारा : गेल्यावर्षी दुष्काळ होता; पण तो बिनपाण्याचा. आता वला दुष्काळ पडलाय. हे.. हे.. समोर दिसतंय त्या पिकात काय जीव हाय का बघा. धो-धो पाऊस पडतोय, त्यामुळे हुत्याचं नव्हतं झालंय. ‘आलं तर गेलं आणि डाळिंबाचं खराटं झालं’, अजूनही राजाचा (शासन) माणूस पंचनाम्याला आला नाही, अशी सल कोरेगाव तालुक्यातील तळियेतील अनेक शेतकरी बोलून दाखवत होते.
युवा शेतकरी विक्रम चव्हाण म्हणाला, ‘दोन एकर आलं केलंय. त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला.या आल्यातून किमान १५ ते २० लाख मिळालं असतं; पण आता हातात काहीच येणार न्हाय. कारण, आल्याचं पीकच सगळं वाया गेलंय. दुसरीकडे डाळिंब बागायतदार नीलेश चव्हाण म्हणाले, ‘गेल्यावर्षी पाणी नव्हतं म्हणून बाग धरली न्हाय. यावर्षी जून महिन्यात बाग धरली. कुठं फुलं, फळ लागायला सुरवात झाली; पण गेल्या चार महिन्यांत सारखा पाऊस पडतोय. त्यामुळं बागाचं खराटं झाल्यातं.१०८ गावे अन् ८७८ हेक्टर क्षेत्र बाधित...कोरेगाव तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे १०८ गावांत पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. तर नजर अंदाजे ८७८ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसलाय. त्यातील ७९० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलाय. तर तळिये गावात सध्या अंदाजे ३०० हेक्टरवर घेवडा, बटाटा १००, आलं ७०, फळबागा ६०, कांदा २५ आणि सोयाबीन १० हेक्टरवर होते. हे सर्व आता वाया गेले आहे.कोरेगाव तालुक्यातील तळिये येथील डाळिंबाच्या बागाही सततच्या पावसाने वाचल्या नाहीत. फुले आणि फळं गळून गेली आहेत. त्यामुळे आता फक्त खराटेच उरल्याचे दिसून आले.