Hoax Calls: मुंबई: अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस नेहमीच अलर्टवर असतात. होतात हालचाली अशावेळी एखादा हॉक्स कॉल आल्यानंतर मात्र पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडते. अशा वेळी यंत्रणा कशी काम करते याबाबत जाणून घेऊया.
टार्गेटवर असलेल्या मुंबईत दर महिन्याला १५ ते २० 'हॉक्स कॉल्स' येतात. पोलिस शहानिशा करतात, तरीही नागरिकांनी सदैव जागरूक राहून तपासात सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घातपात होणार असल्याचा कॉल आल्यावर तात्काळ कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नसतो. अनेकदा या अफवा असतात. अल्पवयीन मुलेही अशा प्रकारचे कॉल्स करतात. आठ वर्षांत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात १० लाखांहून अधिक कॉल्स आले आहेत. ६० ते ७० टक्के कॉल्स निनावी होते. तर त्यात २० टक्के कॉल्स 'हॉक्स कॉल्स होते.
चित्रपटातील हिंसक दृश्ये आणि घटनांचे आकर्षण वाढल्यामुळे लहान मुले धमकीचे कॉल्स करतात. पालकांनी मुलांशी संवाद साधल्यास या घटना कमी होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. नियंत्रण कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची शेवटपर्यंत तपासणी केली जाते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणाच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे नागरिकांनीही याचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती पुरविणे गरजेचे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
असे होतात 'हॉक्स कॉल्स ट्रेस'
नामांकित मोबाइल कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ६ लाखांहून अधिक ग्राहकांचा डाटा नियंत्रण कक्षाशी जोडला गेला आहे. त्यामुळे अनेकदा कॉल्स केलेल्या व्यक्तींची माहिती त्यांच्या स्क्रीनवर येते. कॉलधारकांची माहिती सर्व्हरमध्ये उपलब्ध नसल्यास तो क्रमांक संबंधित मोबाइल कंपनीकडे दिला जातो. पोलिस मुख्यालयात नियंत्रण कक्षात ८० ते ९० पोलिसांची टीम कार्यरत आहे. ऑपरेशन विभागाच्या पोलिस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू असते. नियंत्रण कक्षाला अत्याधुनिक यंत्रणांची जोड देण्यात आली आहे. मिनिटा मिनिटाला खणखणणारे कॉल हाताळण्यास मदत होत आहे.
हॉक्स कॉल आल्यानंतर अशा होतात हालचाली
>> नियंत्रण कक्षात एखादा कॉल दोनवेळा आल्यास त्याचे गाभीर्य लक्षात घेऊन याची माहिती एसीपी कट्रोलला दिली जाते. त्यानंतर एसीमार्फत पोलिस उपायुक्त आणि पोलिस उपायुक्तांकडून ही माहिती आयुक्तांना दिली जाते. त्यानंतर एसीपी कंट्रोलद्वारे स्थानिक पोलिस ठाण्यासह, बॉम्बशोधक पथक, एटीएस यांना सूचित केले जाते.
>> आलेल्या तपशिलानुसार पोलिलस आरोपीचा मागोवा घेतात. त्यानंतर मोबाइल क्रमांकाचे टॉवर लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार त्याचा शोध घेतला जातो.