क्या करे...? ये तो धंदा हैं...
By admin | Published: June 27, 2016 01:42 AM2016-06-27T01:42:28+5:302016-06-27T01:42:28+5:30
रिक्षा असो वा बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सेवा ग्रामीण भागातील ‘वडाप’ सेवेहून खराब झाली आहे
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. रिक्षा असो वा बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सेवा ग्रामीण भागातील ‘वडाप’ सेवेहून खराब झाली आहे. शहर आणि उपनगरांत शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हा धंदा फोफावत आहे. या वाहतुुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार वर्षांपूर्वी शासनाने कडक नियमावली आणली आहे. मात्र, ती केवळ कागदावरच दिसते. पैसा कमावण्यासाठी काही शाळा प्रशासन आणि ठेकेदारांनी ‘क्या करे, ये तो धंदा है!’ असे म्हणत या सेवेचे धंद्यात रूपांतर केले आहे. वाहतूक विभागाला हाताशी घेऊन सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रवासातील त्रुटींवर थेट निशाणा साधण्याचा ‘लोकमत रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न....
>मालकासोबत झालेला संवाद
रिपोर्टर- भावाच्या मुलीसाठी भायखळा पूर्वेकडील घोडपदेव येथून स्कूल बस सुरू करायची आहे.
चालक- करता येईल की.
रिपोर्टर- स्कूल बस पाहता येईल का?
मालक- हो, नक्कीच पाहता येईल.
(स्कूल बस पाहिल्यानंतर)
रिपोर्टर- बसमध्ये आपत्कालीन खिडकी नाही, शिवाय अग्निशमन यंत्रणाही दिसत नाही.
मालक- ही मित्राची बस आहे. आठ दिवसांत माझी नवीन बस येत आहे. त्यात सर्व नियम पाळले जातील.
रिपोर्टर- रजिस्टर आणि बसमार्ग दाखवणारा नकाशाही दिसत नाही.
मालक- नवीन बसमध्ये सर्व सुविधा असतील, तुम्ही काळजी करू नका.
रिपोर्टर- पण शाळेची परवानगी आहे ना?
मालक- हो, सर्व परवानग्या आहेत. माझी एकच गाडी नाही. आणखी गाड्या याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सुरू आहेत. गेल्या वर्षीची एक गाडी विकून नवीन
गाडी घेतली आहे. ती आठ दिवसांनंतर येणार असल्याने ही मित्राची गाडी तात्पुरती सुरू
ठेवली आहे.
(असे म्हणत मालकाने शेजारीच उभी असलेली छोटी चारचाकी गाडी दाखवली. त्यात इतर नियमांचे पालन केल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत होते.)
स्कूल बसमध्ये
काय दिसले ?
प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती असलेले रजिस्टर नव्हते.
बसच्या मागील व पुढील बाजूस स्कूल बस असा उल्लेख नव्हता.
बसमध्ये महिला अटेंडन्ट नव्हती.
चालकाच्या खिशावर ओळखपत्र दिसले नाही.
बसच्या मागील बाजूस दुसऱ्याच शाळेचे नाव होते. त्यामुळे तो जाहिरातीचा भाग असू शकतो.