'काय काय करतात आपल्यासाठी हे...', महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदेंचे उपहासात्मक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:56 PM2021-09-28T17:56:02+5:302021-09-28T17:57:02+5:30
Kedar Shinde : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व निर्माते केदार शिंदे यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे.
मुंबई : मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजीचे व प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे. या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना व मुंबईच्या महापौरांवर देखील निशाणा साधला जात आहे. यातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हाच व्हिडिओ शेअर करत प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व निर्माते केदार शिंदे यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. 'काय काय करतात आपल्यासाठी हे आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो', असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील या व्हिडीओत महापौर किशोरी पेडणेकर खड्ड्यावरुन पालिका सहाय्यक आयुक्तांना झापत असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ कुर्ला येथील जरीमरी भागातील असल्याचे सांगितले जाते. महापौरांनी कुर्ला तसेच पुर्व उपनगरातील रस्तांची पाहाणी केली. कुर्ला येथील पाहाणीत रस्त्यावर पडलेले खड्डे बघून महापौरांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो. #Sarcasmhttps://t.co/7dy9hy5jJq
— Kedar Shinde (@mekedarshinde) September 28, 2021
या व्हिडीओत किशोरी पेडणेकर म्हणतात की, काय चाललंय, तुम्हाला कळत नाही. काय दिसतंय तुम्हाला? आपण आयुक्त आहात? आयुक्ताचे काम करता? ही फाईल फेकून देऊ का? असे महापालिका अधिकाऱ्यांना फटकारत रस्त्यावरील खड्ड्यांकडे बोट दाखवतात. नेमका हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा वापर करत भाजपा आणि मनसेने महापौरांची खिल्ली उडवली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर यांना बसलेला धक्का आणि त्यातून उसळलेला सात्विक संताप पाहा. Grinning face बहुधा आयुष्यात प्रथमच त्यांनी खड्डे पाहिले आहेत. किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वरळी, कलानगर बाहेर मुंबई आहे का ?
भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेतून शिवसेना व मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली. पूर्ण मुंबईचे, संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असते का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का ? याचे कारण नवीन पदपथ करायचा विषय आला की फक्त वरळी. सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते. आता थ्रीडी मॅपिंगही वरळीचे करण्यात येत आहे. आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का? असा सवालही शेलार यांनी केला.