Join us

ओल्या, सुक्या कचऱ्याचे तुम्ही करता तरी काय? ‘लोकमत’च्या मोहिमेने पालिकेला जाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 6:40 AM

मुंबईत ओला व सुका कचरा वेगळा करून जेमतेम ४० टक्के सोसायट्या त्यावर प्रक्रिया करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवला, तो वेगवेगळा गोळा केला आणि त्याची पद्धतशीर विल्हेवाट लावली, तर मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या समस्येला आळा बसेल. हे कानी- कपाळी ओरडूनही ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न मोजकेच नागरिक करतात. त्यांचे प्रयत्न नंतर महापालिकेच्या कचरा नेणाऱ्या गाड्या हाणून पाडतात. कहर म्हणजे हा कचरा पालिकेच्या गाडीत एकत्र होऊनच डम्पिंग ग्राउंडकडे जातो. या ओल्या-सुक्याचे नेमके करायचे काय याबद्दल पालिका प्रशासन, सोसायटींचे व्यवस्थापन आणि नागरिक यांच्यात नेमके नियोजनच नाही. हे वास्तव मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, वसई-विरार पूर्ण नागरी क्षेत्रात सगळीकडे दिसते आहे.

मुंबईत ओला व सुका कचरा वेगळा करून जेमतेम ४० टक्के सोसायट्या त्यावर प्रक्रिया करीत आहेत. नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या व व्यावसायिक संकुलांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे पालिकेने बजावलेल्या नोटिसाही पुन्हा कचऱ्यातच जात आहेत.

‘लोकमत’च्या मोहिमेने पालिकेला जाग

‘लोकमत’ने ‘यंदा कर्तव्य आहे’ या उपक्रमात कचराविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर मुंबई महापालिका जागी झाली असून, आता महापालिका कायद्यातच कारवाईची तरतूद करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

मुंबई घेणार तीन कप्पे असलेली वाहने

काही ठिकाणी कचरा उचलण्यासाठी जुनी वाहने असल्याने त्यात कचरा वेगळा ठेवण्याची सोय नाही. मात्र, लवकरच तीन कप्पे असलेली वाहने महापालिका घेणार आहे, तर कचऱ्यावर वर्गीकरण आणि प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांना नियम पाळण्याची ताकीद देण्यात आली आहे. - सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)

ठाण्यातही सगळी ओरड 

ठाणे- जिल्ह्यातील सर्वच शहरांत साेसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा दिला तरी ताे डम्पिंगवर मात्र एकत्रच जात असल्याचे चित्र आहे.

कल्याण- डोंबिवली शहरात ९० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केल्याचा दावा मनपाचा आहे. मात्र, चाळी, झोपडपट्टी आणि २७ गावांच्या परिसरात अद्याप कचरा वर्गीकरण होत नाही.

नवी मुंबई शहरात ९० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असल्याचा दावा प्रशासनचा आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण खूपच कमी आहे. वाहतूक एकाच गाडीतून केली जात आहे. डंपिंग ग्राउंडवर ताे वेगळा करावा लागत आहे.

मीरा-भाईंदर शहरात ५० ते ६० टन कचरा संमिश्र हाेत असल्याचे सांगितले जाते. गावठाण, झोपडपट्टी भागात घराेघरी कचरा गाेळा केला जात नसल्याने कचरा एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जातो.

वसई-विरार शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट झाली आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात भूखंडच उपलब्ध नाही. यामुळे महानगरपालिकेची चिंता वाढलेली आहे. सध्या गोखिवरे येथील १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राउंड वापरात आहे. तेथे कचरा टाकायला जागा शिल्लक नाही.

टॅग्स :लोकमत इम्पॅक्टमुंबई महानगरपालिका