ईव्हीएममध्ये दडलंय काय?

By admin | Published: April 23, 2015 06:25 AM2015-04-23T06:25:43+5:302015-04-23T06:25:43+5:30

महापालिकेच्या १११ प्रभागांमधील ५६८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

What do you think of EVM? | ईव्हीएममध्ये दडलंय काय?

ईव्हीएममध्ये दडलंय काय?

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या १११ प्रभागांमधील ५६८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्यामुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रणरणत्या उन्हात लांबलचक रांगा लावत ४८.३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी कोणाचा निकाल लागणार की निक्काल लागणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे.
शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. चिंचपाडा, रबाळे, तुर्भे व इतर झोपडपट्टी परिसरात मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तीन ते चार ठिकाणी बोगस मतदानाच्या संशयावरून मारामारी झाली. तणाव वाढू लागल्यामुळे पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांनाही मतदान केंद्रांच्या बाहेर पाठविले होते. १०० मीटरच्या आतमध्ये मतदार वगळता कोणालाही थांबू दिले जात नव्हते. १२ वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. दुपारी उन्हाचा पारा चढल्यामुळे मतदारांची संख्या रोडावली होती. सायंकाळी पुन्हा मतदार केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. ८ लाख १५ हजार ६७ मतदारांपैकी ३,९४,०६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गतवेळी ५०.६० टक्के मतदान
झाले होते.
राजकीय कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत होते. मतदान केंद्र लांब असलेल्या ठिकाणी रिक्षा व इतर वाहनांचीही सोय केली होती. अनेक मतदार शहराच्या बाहेर किंवा शहराच्या इतर भागात वास्तव्य करत आहेत. अशा मतदारांसाठीही वाहने पाठवून बोलावण्यात आले होते. गावाकडूनही मतदारांना बोलावण्यात आले होते.
अनेक प्रभागांत मतदान करण्यासाठी आलेले नागरिक प्रभागात पहिल्यांदाच दिसत असल्यामुळे त्यांच्यावर बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप केला जात होता. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस व निवडणूक विभागाने चोख व्यवस्था केली होती. (प्रतिनिधी)संबंधित छायाचित्रे/२,३

Web Title: What do you think of EVM?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.