- डॉ. अभिजित देशपांडे,झोप ही केवळ विश्रांतीची निष्क्रिय अवस्था नाही. आपला मेंदू कधी कधी जागेपणापेक्षा झोपेत जास्त काम करीत असतो. मुंबई-पुण्यासारखा महानगरांमधील एखादा अतिशय वाहतूक असलेला रस्ता डोळ्यासमोर आणा. दिवसभरात त्या रस्त्यावरील वाहनांनी केलेली पडझड, खड्डे, अपघात, माणसांनी टाकलेली कचरापट्टी याने त्या रस्त्याची दुरवस्था होतेच. आता असे समजा की रात्री ही वर्दळ संपल्यावर सफाई कामगारांची तसेच वाहतूक निरीक्षकांची एक फौजच त्या रस्त्याची पाहणी करायला आली. त्यांनी समजा रस्ता साफ केला, खड्डे बुजवले, सिग्नल्स ठिक केले, दुसऱ्या दिवशी वाहतुकीला अडथळा होणारच नाही असे उपाय केले तर काय बहार येईल!
दिवसभरात आपला मेंदू अशा प्रकारच्या अनेक वाहतुकींमधून जात असतो. अनेक गुंतागुंतीच्या भावनिक तसेच बौद्धिक प्रश्नांची गुंतवळ जमा करीत असतो. आपली झोप ही या गुंतावळीचा उलगडा करण्याचे क्लिष्ट काम करत असते. नीट झोप न झाल्याने दुसऱ्या दिवशी विचारांचा ‘ट्रॅफिक जाम’ होतो. अनेक वर्षे असा भावनिक गुंता राहिला तर त्याचा परिपाक म्हणजे नैराश्य, चिंता, चित्त एकाग्र न होणे!बौद्धिक प्रश्नांची उकल करताना झोप लागते, जाग आल्यावर उत्तर मिळाल्याचा अनुभव अनेक जणांना असेल. यात महत्वाचे म्हणजे भावनिक (इमोशनल) प्रश्न घेऊन झोपी जाऊ नका. कारण जर प्रश्न गंभीर असेल तर झोप खराब होण्याची शक्यता आहे.
समजा,एका कॉलेजच्या लायब्ररीमध्ये दिवसभर विद्यार्थी रकान्यातून पुस्तके काढून टेबलावर पसारा करून ठेवतात. रात्री ग्रंथपाल येऊन तो पसारा आवरून ठेवते, पण तिचे काम जास्त किचकट आहे. ती पुस्तके कोणी वापरली, कशासाठी वापरली, त्यांचा पुढे काय उपयोग होणार याचा वेध घेऊन परत क्रमवारी करणे आणि पुस्तके लावायची रीत बदलणे असे हे सतत बदलणारे काम!
आपली झोप हे असेच काम करते. काही विद्यार्थी वात्रट असतात. ते पुस्तकाला गोंद लावून ठेवतात. जितका जास्त वेळ आणि प्रमाणात गोंद लावला गेला तितके ते पुस्तक टेबलावरून काढणे अवघड ठरते! म्हणजे लायब्ररीयनचा वेळदेखील जातो आणि कधीकधी पुस्तक देखील फाटते. भावनिक प्रश्न हे अशा गोंद लावलेल्या पुस्तकांसारखे असतात. झोपेचा वेळ बरबाद होतो आणि मनाची अवस्था फाटक्या पुस्तकासारखी होते!