नवी दिल्ली - भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) 'स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव' यासंदर्भातील एक पोस्टर जारी केले आहे. यात जवाहरलाल नेहरु यांचा फोटो नसल्याने नवीन वादला सुरुवात झाली आहे. या पोस्टरवर पंडित जवाहरलाल नेहरुंचा फोटो नसल्याने काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आता, या वादात राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन नेहरुंच्या कार्याची माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरुर यांनी आयसीएचआरच्या कार्यक्रमाच्या पोस्टरचा फोटो ट्वीट केला होता. त्यात महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे फोटो आहेत. मात्र, पंडित नेहरुंचा फोटो नसल्याने थरुरु यांनी टीका करत प्रश्न उपस्थित केला होता. आता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात ट्विट करुन प्रश्न विचारला आहे.
''पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात 9 वेळा कारावास भोगला आणि जवळ जवळ 9 वर्षे ते कारागृहात होते. त्यांचे हे योगदान भारतावर प्रेम करणाऱ्या कोणालाच विसरता येणार नाही. पण, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताच्या पोस्टरवरून नेहरुंचा फोटो गायब होण याला काय म्हणावं?.'', असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.
काय म्हणाले होते थरुर
"हे केवळ निंदनीय नाही तर इतिहासाच्या विरोधात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा आवाज राहिलेले जवाहरलाल नेहरु यांना हटवून साजरा केला जात आहे. पुन्हा एकदा आयसीएचआरने आपलं नाव खराब केलं आहे. ही एक सवय बनत चालली आहे!"