"काय दाखवतो? मी संजय शिरसाट आहे एवढं लक्षात ठेव"; शिरसाट पवार जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 09:26 AM2023-07-25T09:26:31+5:302023-07-25T09:30:14+5:30
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावर आंदोलन केले
मुंबई - राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील MIDC च्या प्रश्नावरुन थेट विधिमंडळातच उपोषणाचा मार्ग अवलंबला. आमदार पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील तरुणांसाठी एमआयडीसी मंजूर करावी म्हणत उपोषण केले. त्यावरुन, सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्यात, आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांची आठवण करुन दिली. त्यावर, रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना सुनावलं. त्यानंतर, आता शिरसाट यांनीही पुन्हा पलटवार केला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावर आंदोलन केले. विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बॅनर घेऊन रोहित पवार बसले. आश्वासन देऊनही सरकार प्रश्न मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला सरकार बळी पडलंय. त्यामुळे उपोषण करण्याचा निर्धार रोहित पवारांनी केला. त्यावर सभागृहात अजित पवार यांनी रोहित पवारांना फटकारले. तर, संजय शिरसाट यांनीही सल्ला आणि इशाराही दिला.
रोहित हा माझा मित्र आहे, म्हणून मी त्याला काही सल्ले देत असतो. पण, तो लहान आहे म्हणून मनाला लावून घेतो. मनाला लावून घ्यायचं नसतं, मी त्याला समजावेल असं आमदार संजय शिरसाट यांनी रोहित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच, वेळ आल्यावर दाखवून देऊ या रोहित पवारांच्या इशाऱ्यावर पलटवारही केला. काय दाखवून देऊ?, मी छोटो माणूस आहे, मी घाबरतो सगळ्या गोष्टींना, मला काय दाखवतो बाबा... असे म्हणत पलटवार केला. तर, मी संजय शिरसाट आहे एवढं लक्षात ठेव, मी मित्रत्त्वात सल्ले देत असतो. मला भांडण आवडत नाही, पण भांडलो तर मी सोडत नाही, असा इशाराही शिरसाट यांनी दिला. तसेच, ज्या सरकारने तुझं काम केलं नाही, त्या सरकारला शिव्या दे, असेही त्यांनी सूचवले. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जात यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ, तुम्ही उपोषण मागे घ्या, असं आवाहन केले. त्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार
संजय शिरसाट यांनी त्यांच्याकडे काय सुरू आहे हे पाहावं. हिंमत असेल तर, माझ्या समोर येऊन वक्तव्य करा, असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय. संजय शिरसाट यांना माझ्या मतदार संघाविषयी काय माहिती आहे? त्यांना कर्जत-जामखेडबाबात बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे की नाही, कधी मिळेल, यासाठी पाठपुरावा करा, नको त्या गोष्टींमध्ये उगीच लक्ष घालू नका, असं रोहित पवार म्हणालेत
अजित पवारांनीही कान टोचले
सभागृहात अजित पवार म्हणाले की, १ जुलै २०२३ रोजी आमदार रोहित पवार यांनी २२ जूनला दिलेले पत्र मिळाले. कर्जत जामखेडमध्ये MIDC बाबत होते. त्यावर विभागाने येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसोबत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेण्यात यावे असं कळवले होते. मंत्री महोदयांनी पत्र दिले, अधिवेशन संपले नाही. आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी अशारितीने आंदोलनाला बसणे उचित नाही अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारले.