Join us

मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 10:08 AM

अनेकदा मायक्रोस्पिक कण म्हणजेच, सूक्ष्म धुलीकण सातत्याने वातावरणात राहिल्यास त्याचा फुप्फुस आणि ह्रदयावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. 

मुंबई : गेल्या वर्षाखेरीस मुंबईतील हवेत सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याची तब्येत बिघडली. परिणामी, सातत्याने मुंबईत होणाऱ्या हवेतील बदलांचा आणि शहरातील झाडे, त्यांच्यातील अंतर या सर्व घटकांचा अभ्यास तज्ज्ञ आता करणार आहेत. केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांनी याकरिता पुढाकार घेतला असून पश्चिम द्रुतगती मार्गावरील झाडे आणि हवेचा दर्जा याचा पहिल्या टप्प्यात अभ्यास करण्यात येणार आहे.एन्व्हार्यनमेंटल पोल्युशन रिसर्च सेंटर आणि केईएममधील तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा भाग म्हणून नुकताच पश्चिम द्रुतगती मार्गावरील नागरिकांशी संवाद साधला. तसेच  परिसरातील झाडांच्या आजूबाजूला प्रदूषणाची पातळी किती आहे, याचाही अभ्यास केला. अनेकदा मायक्रोस्पिक कण म्हणजेच, सूक्ष्म धुलीकण सातत्याने वातावरणात राहिल्यास त्याचा फुप्फुस आणि ह्रदयावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. 

दोन झाडांमध्ये किती अंतर असावे?सध्या पालिकेकडून दोन झाडांमध्ये १५ फुटांचे अंतर राखले जाते. दोन झाडांमधील अंतर प्रदूषणाला अटकाव करते का?, याबद्दल तज्ज्ञ अभ्यास करणार आहेत. महामार्ग वा मुख्य रस्त्यांवरील निवासी वसाहतींनी झाडे लावल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे डॉ. अमिता आठवले यांनी नमूद केले.

झाडांच्या आजूबाजूला प्रदूषण अधिक?- प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील निरीक्षणात परिसरातील वातावरणात ४० टक्के वायू प्रदूषण असल्याचे दिसून आले.- महत्त्वाचे म्हणजे झाडांच्या आजूबाजूला प्रदूषणाची पातळी अधिक असल्याचे दिसले. सामान्यतः झाडे अधिक असतात तेथे प्रदूषण नसल्याचे म्हटले जाते.

पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसराचा विचार करता झाडांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, दोन झाडांमधील अंतर कमी असावे, हा विचारही प्राधान्याने व्हायला हवा.- डॉ. अमिता आठवले, श्वसनविकार तज्ज्ञ, केईएम रुग्णालय

टॅग्स :मुंबई