Join us

राख झालेल्या घराचे काय पुरावे देऊ?

By admin | Published: December 09, 2015 1:05 AM

कालपर्यंत इथे आपले घर होते. आज ते बेचिराख झाले आहे आणि पंचनामा करण्यासाठी आलेले अधिकारी राख झालेल्या घराचे पुरावे मागत आहेत.

मनीषा म्हात्रे : मुंबई कालपर्यंत इथे आपले घर होते. आज ते बेचिराख झाले आहे आणि पंचनामा करण्यासाठी आलेले अधिकारी राख झालेल्या घराचे पुरावे मागत आहेत. ही आपल्याच संसाराची राख असल्याचे पुरावे जमविण्यासाठी धडपड करावी लागत आहे... अग्नितांडव शमल्यानंतरचे दामूनगर झोपडपट्टीतले दृश्य! झळ अजूनही बसत असल्याचे तिथे स्पष्ट दिसत होते. कुठे आडोसा घेऊन झोपलेली चिमुकली मुले आणि जळलेल्या भांड्यांची सुरू असलेली आवराआवर मन हेलवणारी होती. प्रत्येकाचे पाणवलेले डोळे खूपकाही सांगून जात होते. अशात पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. या पंचनाम्यादरम्यान हे घर तुमचे आहे? एवढे छोटे घर कसे असू शकते? हे घर तुमचेच आहे, याचा काय पुरावा आहे? अशा नानाविध प्रश्नांची सरबत्ती रहिवाशांवर सुरू होती. ‘ओ साहेब ! ही राख माझ्याच घराची आहे हो. काय पुरावा देऊ?’ असा आकांतही कानी पडत होता.आग लागली नसती तर...अनंत उत्कर्ष चाळीत मंगल गवई यांच्या घरामध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग पसरत जाऊन तीन घरांची राख झाली. त्याच दरम्यान शेजारील घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. डोंगराळ परिसरात उताराच्या भागात असलेल्या कापडी झोपड्यांमुळे आग पसरण्यास सुरुवात झाली. बाजूलाच असलेल्या रेशनिंग दुकानातील साठ्याने यामध्ये आणखी भर पडली. दुकानातील रॉकेल आणि तेलाच्या साठ्याने पेट घेतला. त्यामध्ये दुकानातील दोन सिलिंडरचाही स्फोट होऊन दुपारी साडेबारापर्यंत अनेकांची घरे बेचिराख झाली, अशी माहिती समतानगर पोलिसांनी दिली. दर दोन मिनिटांनी घरात सिलिंडर स्फोट सुरू होते, असे प्रत्यक्षदर्शी शिवाजी शिंदे याने सांगितले.> स्वप्ननगरीतच स्वप्नांची राख : बीडची जया उत्तम खोपे (२१)... हलाखीच्या परिस्थितीत डीएडचे शिक्षण पूर्ण करून ती नोकरीसाठी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत आली. दामूनगर झोपडपट्टीत आत्याकडे राहू लागली. सोमवारी सकाळी आजीला भेटण्यासाठी ती घराबाहेर पडली. आत्याही कामाला निघून गेली. त्यात थोड्या वेळाने आगीची बातमी कानी पडली. घर बेचिराख झाले होते. नोकरीसाठी सोबत आणलेल्या कागदपत्रांची राख झाली. ‘स्वप्ननगरीत माझ्या स्वप्नाचीच राख होईल असे वाटले नव्हते,’ असे जयाने पाणावलेल्या डोळ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ओळखपत्रांसह शिक्षणाचे सारेच पुरावे यामध्ये जळून खाक झाले. राखेत कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न ती करत होती. कागदपत्रांअभावी नोकरी मिळेल की नाही या चिंतेने तिला रडू आवरत नव्हते.> माजी आमदार प्रवीण दरेकर यांच्यातर्फे महिती व मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथून संबंधितांना आवश्यक माहिती पुरवण्यात येणार आहे. मदतीचे साहित्य संबंधितांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आता दुर्घटनाग्रस्तांना जेवण, कपडे, चादरी आणि औषधे पुरवण्यात येणार आहेत. शिवाय वीज प्रवाह खंडित झाल्याने जनरेटर आणि लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत पुनर्वसनाचे आश्वासन दिले.> डोळ्यांदेखत दोन संसार जळत होते...आग लागली त्या दिवशी म्हस्के कुटुंबात लगीनघाई होती. मुलाचा नवीन संसार सुरू होण्यापूर्वीच राखरांगोळी झाली. डोळ्यांदेखत एक नव्हे, तर दोन संसार जळत असल्याचे म्हस्के कुटुंबीयांनी ‘लोकमत’ला सांगितले. एकुलता एक मुलगा असलेल्या किशोरचे त्याच परिसरातील मुलीशी लग्न ठरले. घराबाहेर लग्नाचा मांडव सजला. नातेवाइकांचा गोतावळा जमला. संध्याकाळी हळद असल्याने सकाळी किशोर आईसोबत खरेदीसाठी बाहेर पडला आणि मित्राचा कॉल आला. झोपडपट्टी जळाल्याची बातमी मिळाली. ‘आगीच्या तांडवात माझा आणि मुलाचा संसार जळत होता,’ असे किशोरची आई शांताबाई यांनी सांगितले. हळद लागली नाही, पण आहे त्या कपड्यांमध्ये मंगळवारी विवाह सोहळा पार पडला. मी मात्र घराची राख गोळा करत बसले होते, अशी हकिकत शांताबाईने बोलून दाखविली.> मुंबई काँग्रेस करणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटपआगीत ज्या झोपड्या खाक झाल्या त्यातील रहिवाशांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भेट दिली. त्यांच्यासाठी मुंबई काँग्रेसकडून २ हजार ब्लँकेट, २ हजार चादरी, २ हजार टॉवेल तसेच खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले.पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सोमवारी दुपारी लागलेली आग हा एक अपघातच होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस तपास करत आहेत. गवई कुटुंबीयांसह त्यांच्या घराला लागलेली आग विझविणारे आणि अन्य रहिवासी अशांचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. > आगीनंतरची भयग्रस्त रात्र आग सोमवारी दुपारी विझली. परंतु रात्री पुन्हा सिलिंडरस्फोट होतो की काय, या भीतीने स्थानिकांची झोप उडाली. त्यांनी रात्र अक्षरश: थंडीत जागून काढली. भीमनगर झोपडपट्टीत रिक्षाचालक प्रेमसागर चौबे यांच्याकडे बाळंतपणासाठी आलेल्या प्रिया उपाध्याय या त्यांच्या मुलीनेही आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला खांद्यावर घेऊन सोमवारची रात्र काढली. १९७२च्या दुष्काळानंतर माळीकाम करणारे भीमराव साबळे पत्नी अनसूया साबळे हिच्यासह येथे वास्तव्यास आले. त्यांची झोपडीही बेचिराख झाली.राजकारणातले वैर दूर ठेवून राजकीय पक्षांचे नेते येथे मदतीसाठी धावून आले. आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार राम पंडागळे यांचा यामध्ये समावेश होता. संबंधितांनी दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक मदत केली. शिवाय मदत समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.आगीमुळे साखरपुडा रद्द झालेल्या प्रियांका गाडेकर हिच्या साखरपुड्यासह विवाहाच्या खर्चाची जबाबदारी राष्ट्रवादीचे सचिव रवी दांडगे यांनी उचलली आहे; शिवाय दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक मदतही त्यांनी केली आहे.