Join us

बालकांच्या मृत्यूचे नेमके कारणं काय? भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 7:03 PM

महापौरांनी सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी केली. तसेच अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारिका यांच्याशी चर्चा केली.

मुंबई- भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात २० ते २३ डिसेंबर या कालावधीत चार नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाला शुक्रवारी भेट देऊन बालकांच्या मृत्यूची नेमकी काय कारणे आहेत?  हे जाणून घेऊन संबंधितअधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याच बरोबर सायन रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल तातडीने सादर करावा, असेही महापौरांनी म्हटले आहे.

महापौरांनी सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी केली. तसेच अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारिका यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या,  भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात ऑगस्ट २०२१ पासून २६८ नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २३४ नवजात शिशू  वाचविण्यात येथील डॉक्टरांना यश आले आहे. त्याचप्रमाणे आज भेटलेल्या एका बाळाचे वजन जन्माच्या वेळी १.९०० ग्रॅम होते. ते आज अडीच किलो झाले असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे. हे प्रसूतिगृह सार्वजनिक खाजगी सहभाग प्रकल्पांतर्गत इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उपकरण व निम्न वैद्यकीय वर्ग पुरविण्यात आला आहे. तर सदर संस्थेमार्फत एका सत्रात दोन  अहर्ताप्राप्त डॉक्टर कार्यरत आहे. हे डॉक्टर नवजात शिशू तज्ञ, बालरोगतज्ञ आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नवजात शिशूचा मृत्यू हा जंतुसंसर्गामुळे झाला आहे. चार नवजात बालकांपैकी एक मुलगी व तीन मुले होते. त्यापैकी दोन कमी वजनाची व प्रीमॅच्युअर होती. एक नवजात शिशू गंभीर स्वरूपात दाखल झाले होते. तसेच एका शिशूला फिट येवून गुंतागुंत निर्माण झाली होती. या सर्व नवजात शिशूंवर डॉक्टरांनी योग्य तो औषध उपचार करून त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले असल्याचे महापौरांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाकिशोरी पेडणेकरहॉस्पिटल