मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे. "९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!", अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे.
गेल्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना मध्येच अचानक ब्रेक लागला. राज ठाकरे दोन आठवड्यांपूर्वी अमित ठाकरेंसह दिल्लीला जाऊन आले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाहांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अचानक मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा एकाएकी थांबल्या आहेत. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना साद घातली आहे. राज ठाकरे यांनी ९ तारखेला गुढीपाडवा मेळाव्याला येणाचे आवाहन मनसैनिकांना केले आहे. तसेच, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असे म्हणत राज ठाकरे यांनी नक्की काय घडलंय, काय घडतंय? हे सर्व गुढीपाडवा मेळाव्यात सांगणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तीन पक्ष आहेत. त्यांच्यात जागावाटपावरुन बरीच रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आधी जागावाटप निकाली लावू आणि मग मनसेसोबत युतीचा निर्णय घेऊ, असा पवित्रा भाजपाने घेतल्याचे दिसते.