Join us

‘ती’चे स्वातंत्र्य नेमके कशात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक मुलींसाठी, महिलांसाठी स्वातंत्र्याची व्याख्या, त्याचे अर्थ हे अभिव्यक्तीप्रमाणे बदलत जातात असा निष्कर्ष ‘हर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रत्येक मुलींसाठी, महिलांसाठी स्वातंत्र्याची व्याख्या, त्याचे अर्थ हे अभिव्यक्तीप्रमाणे बदलत जातात असा निष्कर्ष ‘हर सर्कल’ या महिलांसाठी असलेल्या डिजिटल कंटेंट आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्मकडून मांडण्यात आला आहे.

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशातील मुली आणि महिलांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय आणि अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांच्या पंखांना बळ देते हे जाणून घेण्याचा प्रयत्न हर सर्कलमार्फत विविध मुलाखती, प्रश्न यातून करण्यात आला होता. या संकल्पना, मुलाखती एका व्हिडिओ रूपात एकत्रित करण्यात आल्या असून, त्या प्रसारित करण्यात आल्या आहेत.

हे सर्वेक्षण करताना ६ वर्षे ते ९९ वर्षांपर्यंतच्या मुली, महिला, आजी अशा समाजातील प्रत्येक जात, धर्म, पंथातील स्त्रियांचा अंतर्भाव करण्यात आला. लहान मुलींसाठी खेळ खेळणे, मस्ती करणे हे एक प्रकारचे स्वातंत्र्य आहे तर महिलांसाठी सध्याच्या जगात त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. वयोवृद्ध महिलांसाठी त्यांचे या वयातही आत्मनिर्भर असणे त्यांच्या पंखांना बळ देत असते. याशिवाय स्वतःचा उद्योग उभा करणे, एकटेच प्रवास करणे, एखाद्याची काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडणे, मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त फिरणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, ऑफलाइन, ऑनलाइन भाषा स्वातंत्र्य, दुचाकी चालवणे अशा अनेकाविध संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य असल्याचे मत महिलांनी या सर्वेक्षणात मांडले आहे.

जगात फक्त यशस्वी नाही तर प्रत्येक महिलेच्या स्वातंत्र्याची गणती होणे आवश्यक असल्याचे मत हर सर्कल मार्फत मांडण्यात आले. याच कारणास्तव आणि उद्देशाने महिलांना आपली मते व्यक्त करण्याचा आणि आवाज पोहचविण्याचा हक्क या हर सर्कल स्वतःच्या व्यासपीठमार्फत देत आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांच्या स्वातंत्र्याची व्याख्या, संकल्पना जगासमोर मांडली जावी या हेतूने व्हिडीओ कॅम्पेन करण्यात आल्याचा उद्देश हर सर्कलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. (वा. प्र.)